-सुधीर देसाई (साथी चंदूभाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठान)शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या मलाला युसुफझई हिच्या कार्याची ओळख करून देणारे ‘सलाम मलाला’ हे पत्रकार संजय मेश्राम यांचे पुस्तक वाचले आणि बैचेन झालो. या पुस्तकात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाच्या हक्कासाठी संघर्ष करणा-या मलालाचे साहस डोळ्यांसमोर तरळू लागले. एका शाळकरी मुलीसमोर तालिबानी बंदुक रोखतात आणि विचारतात, कोण आहे मलाला? त्यांना न घाबरता उत्तर देणारी मलाला पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर उभी राहते. शाळेत जाता यावे म्हणून तालिबानींच्या गोळ्या झेलणारी मलाला मला खुणावू लागली. स्त्री शिक्षणाचा मुद्दा असला की भारतातील धर्मांध असू दे किंवा तालिबानी असू देत. सर्वांची भूमिका समान. मुलींनी शिक्षण घ्यायचं नाही! शिक्षण घ्यायचं नाही!अगदी पार शतकापूर्वी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असोत नाही तर मलाला असो; सर्वांना दडपशाहीला सामोरे जावेच लागते. समाज आपल्या टाचेखाली राहावा यासाठी त्याला शिक्षणापासून, विवेकवादापासून रोखायचे हे अनेक शतके जगभर सुरू आहे. यात सामाजिक, आर्थिक, विषमता आणखी भर घालतात.भारतामध्ये मुस्लिम समाजाचा अभ्यास करणाºया सच्चर आयोगाने मुस्लिम समाजाचे भयानक वास्तव पुढे आणले आहे. आजच्या घडीला मुस्लिम समाज सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. हे मागासलेपण दूर कसे होईल, यासाठी काही संघटना प्रयत्न करतात. तर एक वर्ग अशा सुधारणांना विरोध करीत असतात. ते अधिकाअधिक बंधनाचे फतवे काढीत असतात. मलालावरील हल्ला हा याचाच एक भाग आहे. मलालाने अगदी कमी वयात साहस दाखवून मुलींच्या शिक्षणाचा प्रचार केला, हे एक अत्यंत आदर्श उदाहरण भारतीय मुस्लिम मुलींसमोर ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. या वर्गामध्ये मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण बरेच कमी आहे. यासाठी संजय मेश्राम यांचे ‘सलाम मलाला’ या पुस्तकाचा उर्र्दूमध्ये अनुवाद करून मुस्लिम मुलांपर्यंत पोहोचवण्याचा विचार मनात आला. तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न सरू केले.मलालाच्या साहसामधून मुलींना प्रेरणा मिळावी आणि त्यांनी शिक्षणाची कास धरावी, आपली प्रगती करावी हा प्रयत्न या उर्दू पुस्तकाच्या प्रकाशनामागे आहे. अनुवाद करुन घेणे ते प्रकाशन यासाठी सातत्याने दोन वर्षे प्रयत्न सुरू होते. आंतरभारतीचे अभ्यासक आणि आमचे मित्र प्राचार्य प्रकाश अधिकारी यांना ही कल्पना सांगितली. त्यांनी तत्काळ रायगड जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही असलेल्या तसेच अंजूमन इस्लाम कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य, शिक्षणतज्ञ श्रीमती फिरदौस धनसे यांचे नाव सुचविले. श्रीमती धनसे यांनी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. यामुळेच एका प्रयत्नाला मूर्त स्वरुप आले आहे. श्रीमती धनसे यांचे आभार मानण्यासाठी शब्दच अपुरे आहेत. त्यांच्या ॠणातच राहणे योग्य ठरेल. आमचे ज्येष्ठ मित्र ए. वहाब धनसे, प्राचार्य डॉ. ए. आर. उंर्दे महिला पदवी महाविद्यालय, जिल्हा रायगड आणि प्रकाश अधिकारी यांचेही आभार. मराठीतील ‘सलाम मलाला’ या पुस्तकाचा उर्दू भाषेमध्ये अनुवाद करण्यास आनंदाने परवानगी देणारे लेखक संजय मेश्राम आणि मनोविकास प्रकाशन संस्थेचे श्री. अरविंद पाटकर यांचेही मन:पूर्वक आभार. पुस्तक प्रकाशनामधील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी साहाय्य आणि मार्गदर्शन करणारे साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सय्यदभाई, अब्दुल कादर मुकादम, मलिक अकबर यांचेही सहकार्य मोलाचे आहे.साथी चंदूभाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठान मागील दहा वर्षे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे फिनिक्स प्रकल्प राबवीत आहे. योग्य शिक्षण घेऊन आपली प्रगती करु इच्छिणाºया मुलांचा सहभाग या प्रकल्पामध्ये असतो. शिकून मोठे होऊ इच्छिणाºया मुलांसमोर आज अनेक अडचणी आहेत. या अडचणींवर मात करण्याची प्रबल इच्छा या मुलांमध्ये निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे जो मुलींच्या शिक्षणासाठी आग्रह धरणा-या मलालामध्येही आम्हाला दिसतो. भारतातील मुस्लिम समाजातील मुलींनीही मलालाच्या प्रयत्नाला साथ द्यावी, अशी आमची मनोमन इच्छा आहे.
सलाम मलाला उर्दूतही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 8:40 PM