सांगवी: कोरोना सारख्या महामारीत चोवीस तास पोलिसांच्या बरोबरीने रस्त्यावर उभे राहून कामं करणाऱ्या होमगार्ड तथा गृहरक्षक जवानांचे अनेक बंदोबस्ताचे वेतन ठाकले आहे. अशा कठीण परिस्थितीत घर खर्च भागवण्यासाठी घरातील महिलांचे दाग दागिने गहाण ठेवण्याची वेळ या जवानांवर आली आहे.
याप्रसंगी उधार, उसनवार करत अनेक जण आपला घरप्रपंच चालवत आहेत. महाराष्ट्रातील सर्वच होमगार्ड जवानांची सध्या बिकट अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे यापुढे शासनाने होमगार्ड जवानांचे महिन्याला वेतन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. घरातील आई, पत्नी यांचे दागिने घाण ठेऊन संसार चालवण्याची वेळ आल्याने जवानांनी शासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाची सध्या विदारक परीस्थिती निर्माण होऊन त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत असल्याचे जवानांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
राज्यात सण उत्सव,दंगल सदृश कालावधीत पोलीस दलाला सहाय्य करणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांचे सातत्याने वेतन रखडत असल्याने त्यांचे हाल सुरु झाले आहेत. बारामती शहरासाठी ४० जवान कार्यरत असून बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात ३० तर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात २० जवान कार्यरत आहेत. तर जिल्ह्यात एकूण दिड हजारांच्या जवळपास होमगार्ड कार्यरत आहेत. तर त्यापैकी मोजक्या जवानांच्या हाताला काम मिळत आहे.
होमगार्ड यांनी केलेल्या दोन वर्षांमधील काही बंदोबास्तांचे देखील वेतन थकले आहे. यामध्ये लोकसभा निवडणूक, भिमाकोरेगाव बंदोबस्त, सध्या सुरु असलेला कोविड १९ मधील काही महिन्यांच्या बंदोबस्ताचे वेतन थकीत आहे. असे अंदाजे एका जवानाचे ६५ हजार रुपये थकीत आहेत. यापैकी लोकसभा निवडणूक, आळंदी पालखी सोहळा याचे राज्य शासनाकडे मानधन थकले आहे. तर कोविड १९ मधील वेतन जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून येणे बाकी आहे. या थकीत वेतना मुळे घराचा उदरनिर्वाह करायचा कसा हे प्रश्न चिन्ह त्यांच्या समोर नेहमीच उपस्थित होत आहे. यामुळे शासनाने लवकरात लवकर रखडलेले वेतन जमा करावे अशी मागणी होमगार्ड जवानांनी केली आहे.