पुणे : वाहन चालकांची भर्ती करण्यासाठीच्या निविदा काढण्यापासून त्या रद्द करून पुन्हा फेरनिविदा काढण्याच्या गोंधळात, कोरोनाच्या साथीतही कार्यरत राहणाऱ्या सुमारे ७४० कंत्राटी वाहन चालकांना एक महिन्याचे वेतन मिळालेले नाही. महापालिकेच्या कचरा उचलण्याच्या वाहनांपासून अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनांपर्यंत बहुतांशी ठिकाणी महापालिकेकडून कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.कोरोनाच्या काळामध्येही हे कंत्राटी चालक अविरत सेवेमध्ये कार्यरत राहिले. मात्र, एक महिन्यापासून या चालकांना वेतनच मिळालेले नाही. कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक गणित कोलमडले असतानाही महापालिका प्रशासनाकडून कंत्राटी वाहन चालकांच्या नियुक्तीसाठी पाच वर्षांची निविदा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर हा निर्णय मागे घेऊन दोन वर्षांसाठी कंत्राट काढावे अशी सूचना काहींनी केली. यात अखेर यावर्षी तरी पुर्वीप्रमाणेच एक वर्षासाठीच निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व घडामोडीत जुलैमध्ये कंत्राटी वाहन चालक पुरवण्याची निविदा काढण्यात आली. यामध्ये चार ठेकेदार सहभागी झाले होते. यापैकी दोन ठेकेदार पात्र ठरले. पण अचानक ही निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सदर गोंधळात मात्र कोरोना काळात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सुमारे ७४० कंत्राटी वाहनचालकांचे वेतन अडकले गेले. याबाबत पालिकेच्या वाहन विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नव्याने कंत्राटी वाहन चालक नेमण्याची निविदा काढण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच लवकरच या निविदेला मंजुरी देण्यात येऊन, साधारण आठवडाभरात सर्व कंत्राटी वाहन चालकांचे वेतन देण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. ---------------------------------------
पुणे महापालिकेच्या ७४० कंत्राटी वाहन चालकांचे वेतन अडकले; प्रशासकीय गोंधळाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:58 PM
कोरोनाच्या काळामध्येही हे कंत्राटी चालक अविरत सेवेमध्ये कार्यरत राहिले.
ठळक मुद्देआठवडाभरात कंत्राटी वाहन चालकांचे वेतन देण्यात येणार: वाहन विभागाचे उपायुक्तांचे स्पष्टीकरण