पुणे : महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही महापालिकेच्या विविध विभागातील कंत्राटी सुरक्षा रक्षकांना अजूनही वेतन मिळालेले नाही. मागील तीन महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेले नसून प्रशासनाने आयुक्तांचा आदेशही धाब्यावर बसवल्याचे दिसते आहे.सुमारे हजारभर सुरक्षा रक्षकांना महापालिकेने गेल्या तीन महिन्यांचे वेतन दिलेले नाही. अंदाजपत्रकात सुरक्षा रक्षकांच्या वेतनासाठी दर वर्षी ३४ कोटी रुपयांची तरतूद असते. यावर्षींच्या अंदाजपत्रकात ती फक्त १४ कोटी रूपयेच करण्यातआली.त्यामुळे अनेक सुरक्षा रक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तर काही सुरक्षा रक्षकांची सेवाच खंडित केली असून काम पण नाही व वेतनही नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे.महापालिका कंत्राटी कामगार संघटनेच्या माध्यमातून या प्रश्नावर आंदोलन करण्यात आले. नगरसेवक राजेंद्र शिळिमकर या संघटनेचे पदाधिकारी आहे. त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली होती. महापौर मुक्ता टिळक तसेच स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. त्यामुळे आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रशासनाला सर्व सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन त्वरित अदा करण्याचे आदेश दिले होते, मात्र वेतन द्यायचे तर कशातून द्यायचे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. ऐन सणासुदीच्या काळात काम करूनही त्याचे पैसे न मिळाल्यामुळे सर्व सुरक्षा रक्षक हवालदिल झाले आहेत. जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडून त्यांना काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या सेवेत कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले होते.यातअनेक महिला सुरक्षा रक्षकही आहेत. त्यांनाही वेतन मिळालेले नाही. त्यांनाही कर्ज काढून संसार भागवावा लागतो आहे.
सुरक्षा रक्षकांचे वेतन रखडलेलेच, आयुक्तांचा आदेश धाब्यावर : नोकरीची शाश्वतीही संपलेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 2:30 AM