धायरी : पुणे जिल्ह्यातील ताडी विक्रेत्यांकडून ताडीमध्ये क्लोरस हायड्रेट मिसळून ताडी विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आलेआहे. या भेसळयुक्त ताडी सेवनाने मानवी प्रकृतीवर घातक परिणाम होत असल्याने तिच्या विक्रीची अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करावी, अशी मागणी आमदार भिमराव तापकीर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली आहे.
यावेळी बोलताना तापकीर यांनी भेसळयुक्त ताडी विकणाऱ्यांविरुध्द नियमानुसार गुन्हा नोंद करुन फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली. शासनाने ह्या प्रकरणात केलेल्या चौकशीत काय आढळून आले व चौकशीच्या अनुषंगाने संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली. असा प्रश्न उपस्थित केला.
त्यास उत्तर देताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले, हे अंशत: खरे आहे. पुणे जिल्हयात अवैध ताडी उत्पादन / विक्रीबाबत जानेवारी, २०२१ ते ७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एकूण ३६ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत . तर ३,१८१ लिटर ताडी जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर ७४,८५०/- इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या कलम ९३ अन्वये अवैध ताडी विक्री करणाऱ्या १५ सराईत व्यक्तींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. पुणे जिल्हयामध्ये सन २०२०-२१ या ताडी वर्षाकरीता एकही सरकारमान्य ताडी अनुज्ञप्ती कार्यरत नसल्याने अवैध ताडी विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढील काळातही अवैध ताडी उत्पादन विक्रीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.