उघड केला होता प्रकार
बारामती :रेमडेसिविर इंजेक्शनच्या मोकळ्या बाटलीत पॅरासिटीमॉल भरून काळ्या बाजारात विक्री केल्याचा प्रकार बारामती ग्रामीण पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच उघड केला होता. पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी (दि. १६) एमआयडीसीत पेन्सिल चौकात त्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. रेमडेसिविरच्या तुटवड्याचा फायदा घेऊन हा प्रकार सुरू होता.आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघाजणांवर तालुका पोलिसांनी मंगळवारी(दि २०) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : दिलीप ज्ञानदेव गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती), संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर), प्रशांत सिध्देश्वर धरत (रा. भवानीनगर, ता. इंदापूर) व शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) अशी चौघा जणांची नावे आहेत. याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाचे निरीक्षक विजय नगरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले की, बारामती शहरातील गोरड हॉस्पिटलमधील स्वप्नील जाधव (रा. फलटण, जि. सातारा) या रुग्णाला हे बनावट रेमडेसिविर इंजेक्शन दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा जबाब डॉ. गोरड यांनी पोलिसांना दिला आहे.त्यानंतर त्या चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे.
दरम्यान ,दवाखान्यात रिकाम्या झालेल्या बाटल्या संदीप गायकवाड गोळा करत असे . त्यात पॅरासिटीमॉल भरुन त्या रेमडेसिविरच्या ओरिजनल बाटल्या असल्याचे भासवले जायचे. दिलीप गायकवाड हा हेल्थ इन्शुरन्सचे काम करत असल्याने त्याच्याकडे या इंजेक्शनबाबत नातेवाईक चौकशी करीत असत. संबंधित नातेवाईकांना जादा दराने हे इंजेक्शन देण्याचे काम गायकवाड हा प्रशांत धरत व शंकर भिसे यांच्या मार्फत करत असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे.बनावट रेमडेसिविरमुळे परिसरात खळबळ उडाली होती.पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, या चौघांनी किती जणांना ही बनावट इंजेक्शन्स दिली, कोणत्या आणि किती रुग्णांना ती देण्यात आली आहेत, याबाबत पोलीस मुळाशी जाऊन तपास करीत आहेत. प्रकरणात सहभागी सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले.त्यामुळे या प्रकरणाकडे बारामतीकरांचे लक्ष वेधले आहे.
————————————————