पुणे : गॅस सिलेंडरची जादा किंमतीला विक्री करुन काळाबाजार करणार्या बोपोडीतील श्रीनाथजी गॅस एजन्सीच्या मालकासह चौघांना खडकीपोलिसांनीअटक केली आहे. गॅस एजन्सीचे मालक श्रीकांत विश्वासराव पाटील (वय ५१, रा. सावली बोपोडी गावठाण), एजन्सीचे चालक ऋषीकेश श्रीधर भोपटकर (वय ४७, रा. गुडवील सोसायटी, औंध), तेथील कामगार नरेंद्र रघुवीरसिंग ठाकूर (वय ३१, रा. दापोडी), विजय जीवन मुदलीयार (वय ४६, रा. शंकर काची चाळ, दापोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. त्यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना बोपोडी येथील भाऊ पाटील रोडवरील छाजेड पेट्रोल पंपाजवळ २६ मार्चला दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडला. त्यांच्याकडून भारत गॅस कंपनीचे ३६ हजार ६१६ रुपयांचे ४८ घरगुती गॅस सिलेंडर, ६० हजार रुपयांचे २ तीनचाकी टेम्पो आणि बाराशे रुपये असा ९७ हजार ८१६ रुपयांचा माल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल बबन भोसले यांनी खडकीपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. खडकी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना छाजेड पेट्रोल पंपाजवळील मैला पाणी शुद्धीकरण केंद्रासमोर नरेंद्र ठाकूर आणि विजय मुदलीयार हे दोघे श्रीनाथजी गॅस एजन्सीचे मालक व चालक यांच्या सांगण्यावरुन गॅस सिलेंडरची किंमत ७९० रुपये असताना तो १२०० रुपयांना विकून काळा बाजार करताना आढळून आले. पोलीस निरीक्षक शकिल पठाण अधिक तपास करीत आहे.