लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात कर्नाटक येथून येणारा आंबा कोकणातील ‘देवगड हापूस’ या नावाने विकत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी बाजारातील तीन अडत्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये एच. बी. बागवान शेड नं.२, नॅशनल फ्रूट शेड नं. ३, लोकमल नारायणदास पंजाबी शेड नं. ४ या तीन अडत्यांकडून १७,७०० रुपये दंड वसूल केला आहे. बाजारात आंब्याचा हंगाम बहरला आहे. परंतु अनेक विक्रेत्यांकडून परराज्यातील विविध जातींचे आंबे ‘कोकण हापूस’ या नावाने विकले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. या फसवणुकीस आळा बसण्यासाठी राज्याचे पणन संचालक सतीश सोनी यांनी परिपत्रक काढले आहे. अशा फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचा आदेश सोनी यांनी राज्यातील बाजार समित्यांना दिला आहे.
त्या पार्श्वभूमीवर गरड यांनी बाजारात आंब्याचा व्यापार करणाऱ्या सर्व अडत्यांना सूचना केल्या होत्या. सोमवारी गेट नं. ७ येथील आंबा बाजाराला गरड यांनी भेट दिली. या वेळी काही अडते कर्नाटक येथून येणारा आंबा कोकणातील ‘देवगड हापूस’ या नावाने विकत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘देवगड हापूस आंबा’ या नावाच्या पेटीत कर्नाटक येथील आंबा भरून त्यामध्ये तो विकला जात होता. यामुळे गरड यांनी तीन अडत्यांवर कारवाई केली आहे.
------------------------------
कर्नाटक येथील आंबा ‘देवगड हापूस आंबा’ या नावाच्या पेट्यामध्ये तो विकला जात होता. त्यामुळे पहिल्यांदा पाच हजार रुपये दंड वसुल केला आहे. तसेच दुसऱ्या वेळेस दहा हजार रुपये दंड वसूल केला जाईल. त्यानंतर तसा प्रकार आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे