पुणे: अमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने पेट्रोलिंग करताना अमली पदार्थ विरोधी पथक १ ने दोन ठिकाणी कारवाई करीत तब्बल ६ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इस्माईल दावलसो बडेघर (वय- ४८ वर्षे, रा. पाटील वस्ती, येवलेवाडी, कोंढवा खुर्द्र, पुणे) व आकाश देवराम पांडियन (वय २४ वर्षे, रा. वर्धमान सोसायटी, मिठानगर, कोंढवा पुणे) अशी त्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना सोमजी बसस्टॉप जवळ इस्माईल बडेघर हा गांजा विक्री करीत असल्याचे पोलीस अंमलदार मनोज साळुंके यांना माहिती मिळाली. दरम्यान पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ताब्यात २२ हजार रुपयांचा १ किलो १२८ ग्रॅम गांजा आढळून आला. तर दुसऱ्या ठिकाणी कोंढवा येथील काकडे वस्ती परिसरात आकाश पांडियन हा मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अंमलदार सचिन माळवे यांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडून १ लाख ५७ हजारांचे १० ग्रॅम ४८० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), एक मोबाईल हॅण्डसेट, एका दुचाकी व चारचाकी वाहनासह एकूण ६ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस अंमलदार मारुती पारधी, संदिप जाधव, मनोज साळुंके, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदिप शिर्के, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली आहे.