पुणे : कसलाही गाजावाजा न करता पुण्यात रविवारी प्रति किलो शंभर रुपये किलो भावाने तूरडाळ विक्रीस सुरूवात झाली. मात्र, दिवसभर केवळ एकाच ठिकाणी ही डाळ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. पहिल्या दिवशी आलेल्या १० टन डाळीपैकी ६ टन डाळीच्या विक्री झाली. सोमवारी पुण्यात आणखी २० टन डाळ उपलब्ध होणार आहे.पालकमंत्री गिरीश बापट यांनी शंबर रुपये किलो भावाने तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. पुण्यात तूरडाळ जप्त करण्यात न आल्याने पुणेकर १०० रुपये किलो डाळीपासून वंचित राहणार, हे स्पष्ट होते. त्यावर विरोधी पक्ष व अनेक पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात शनिवारी विभागीय उपायुक्त प्रकाश कदम यांनी दि पुना मर्चंट्स चेंबरच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी शंभर रुपये किलोप्रमाणे डाळ उपलब्ध करून दिल्यास विक्रीची जबाबदारी घेऊ, अशी भूमिका मांडली. मात्र, रात्री उशिरापर्यंत पुण्यात डाळ येण्याबाबत निर्णय झाला नव्हता. या वेळी प्रकाश कदम यांच्यासह चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, पोपटशेठ ओस्तवाल आदी उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती देताना चोरबेले म्हणाले, पालकमंत्री बापट यांनी ही तूरडाळ विक्रीची जबाबदारी चेंबरवर सोपविली आहे. रविवारी पहाटे १० टन डाळ पुण्यात दाखल झाली. दिवसभर सुमारे ६ टन डाळीची विक्री झाली. ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांनी समाधान व्यक्त केले. सोमवारी आणखी २० टन डाळ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
पुण्यात १०० रुपयात तूरडाळ विक्री सुरू
By admin | Published: November 09, 2015 1:54 AM