पुणे (येरवडा): ' बोईंग ७३७ मॅक्स' या श्रेणीतील विमानांच्या वापरास बंदी असूनही 'मेक माय ट्रीप' या कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवरून स्पाईस जेट कंपनीच्या विमानाचे 'बुकिंग' घेऊन नंतर हे विमान (फ्लाईट) रद्द झाल्याचे सांगून आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी संबंधित ग्राहकांनी पुणे शहर पोलीस व नागरी विमान वाहतुक मंत्रालयाकडे तक्रार दिली आहे. महापालिकेचे वृक्ष प्राधिकरण सदस्य अरविंद गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरीनाथ गरुड, शिवसेनेच्या युवा सेनेचे शहरप्रमुख नितीन भुजबळ, व्यावसायिक गौरव शर्मा अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत. या चौघांनी पुण्यातून जम्मू-काश्मिरमधील श्रीनगरला जाण्यासाठी 'मेक माय ट्रीप'वरून २२ एप्रिलला ४ जून २०१९ रोजीचे ऑनलाईन बुकिंग केले होते. त्यावेळी त्यांना इंडिगो एअरलाईन्सचे पुणे ते अहमदाबाद व स्पाईस जेटचे अहमदाबाद ते श्रीनगर अशा २ विमानांचे ऑनलाइन तिकीट देण्यात आले. यासाठी मेक माय ट्रिपकडून चौघांच्या तिकिटासाठी सुमारे ३९ हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. त्यानंतर भुजबळ व त्यांच्या मित्रांना अहमदाबाद-श्रीनगर दरम्यानचे विमान रद्द झाल्याचे स्पाईस जेटकडून ६ मे रोजी ई-मेलद्वारे कळवण्यात आले. यासाठी स्पाईस जेटकडून सरकारने बोईंग ७३७ मॅक्स या विमानांच्या वापरास बंदी घातल्याचे कारण दिले होते. यानंतर भुजबळ यांनी अधिक चौकशी केली असता, केंद्र सरकारच्या नागरी विमानवाहतुक मंत्रालयाच्या महासंचालकांनी २ महिन्यांपूर्वीच १३ मार्च २०१९ ला स्पाईस जेट कंपनीला त्यांच्याकडील बोईंग ७३७ मॅक्स या विमानांच्या वापरास प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी बंदी घातल्याचे निदर्शनास आले. जर सरकारने १३ मार्चला या विमानांच्या वापरावर बंदी घातली असेल, तर त्यानंतर जवळपास सव्वा महिन्याने २२ एप्रिलला व तेही पुढच्या २ महिन्यानंतरचे ४ जूनचे तिकीट मेक माय ट्रीप आणि स्पाईस जेटने दिलेच कसे, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. मात्र त्यांना मेक माय ट्रीपकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पुणे शहराचे पोलिस आयुक्त, बंडगार्डन व कोरेगाव पार्क पोलिस ठाणे, दिल्लीतील नागरी विमानवाहतुक मंत्रालयाकडे तक्रार दिली आहे. भुजबळ म्हणाले, अशाप्रकारे हजारो नागरिकांना रद्द झालेल्या विमानांची ऑनलाईन तिकिटांची विक्री करून सदरच्या कंपन्या शेकडो कोटी रुपये जमा करून मोठा घोटाळा करत असण्याची शक्यता आहे. विमान रद्द झाल्याने मोठ्या मनस्ताप सहन करावा लागत असल्याने व तितकासा वेळ नसल्याने अनेक प्रवाशी विमान कंपनीने पैसे कापून दिलेला 'रिफंड' घेऊन गप्प बसतात. याप्रकरणी मेक माय ट्रीपच्या पुण्यातील कार्यालयात संपर्क साधला असता, या प्रकरणाशी पुण्यातील कार्यालयाचा काहीही संबंध नाही. याविषयी आपल्याशी कंपनीच्या कायदेशीर कार्यालयाकडून पुन्हा संपर्क साधण्यात येईल, असे सांगून लोकमत प्रतिनिधिकडून नाव व संपर्क क्रमांक घेण्यात आला. मात्र त्यानंतर कोणीही संपर्क साधला नाही.
स्पाईस जेट विमानाच्या उड्डाणावर बंदी असूनही तिकिटांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 1:45 PM
ऑनलाइन पोर्टलवरून स्पाईस जेट कंपनीच्या विमानाचे 'बुकिंग' घेऊन नंतर हे विमान (फ्लाईट) रद्द झाल्याचे सांगून आर्थिक फसवणुक केल्याची तक्रार दिली आहे.
ठळक मुद्देनागरिकांची फसवणूक; मेक माय ट्रीप व स्पाईस जेटविरोधात तक्रार विमान रद्द झाल्याचे स्पाईस जेटकडून ६ मे रोजी ई-मेलद्वारे कळवण्यात आलेरद्द झालेल्या विमानांची ऑनलाईन तिकिटांची विक्री करून सदरच्या कंपन्या मोठा घोटाळा करत असण्याची शक्यता