लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : घरच्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेत कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी एक जण सेल्समन बनला तर दुसरा हॉटेलमध्ये वेटर तर दोघांनी वॉचमन आणि मदतनीस म्हणून कामास सुरुवात केली. पण शिक्षण घेण्याच्या ओढीने स्वस्थ बसू न दिल्याने रात्रशाळेचा आधार घेतला. दिवसा काम व रात्रीचा ‘दिवस’ अशी कसरत करीत त्यांनी बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे.अमर शिंदे, विठ्ठल देशमुख, संतोष पेडणेकर आणि गंगाधर रासगे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे चौघेही पूना नाईट हायस्कूलमधील विद्यार्थी आहेत. बारावीमध्ये ८०.१५ टक्के गुण मिळवत अमरने शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर विठ्ठल बंडू देशमुख याने ७९.०७ टक्के व संतोष शंकर पेडणेकर याने ७७.८४ टक्के गुण मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. तर दीपाली गजमल हिने ६६.६२ टक्के गुण मिळवत मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. हायस्कूलचा एकूण निकाल ८०.१५ टक्के लागला आहे. अमर हा एका तुळशीबागेतील सराफी दुकानात सेल्समन म्हणून नोकरी करतो. दिवसभर काम करून रात्री नऊपर्यंत तो हायस्कूलमध्ये जातो. आई-वडील वेल्हा तालुक्यात शेती करतात. शिक्षणासाठी सहावीपासून तो पुण्यात काकांकडे राहायला आहे. या यशाबद्दल तो म्हणाला, सकाळी दहा ते सहा वेळेत नोकरीची वेळ होती. त्यामुळे सकाळी दोन तास नियमित अभ्यास करत होतो. नोकरीच्या ठिकाणीही वेळ मिळाल्यास अभ्यास करायचो. सनदी लेखापाल म्हणून करिअर करण्याची इच्छा आहे.विठ्ठल देशमुख या विद्यार्थी जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये ११ ते ४ यावेळेत वेटरची नोकरी करतो. ‘काम संपल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता शाळेत येऊन अभ्यास करायचो. सकाळी अभ्यासिकेत जात होतो. आई-वडील जालन्याच्या परतूर तालुक्यातील बानाची वाडी येथे शेती करतात. पुण्यात मित्रांसोबत राहतो. भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असून, मोठा अधिकारी होण्याची इच्छा आहे,’ अशी भावना त्याने व्यक्त केली.एका सनदी अधिकाऱ्याच्या कार्यालयात मदतनीस म्हणून नोकरी करणारा संतोष पेडणेकरला आयकर विभागातील अधिकारी व्हायचे आहे. या यशाबद्दल आनंद व्यक्त करीत तो म्हणाला, रोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत काम करून अभ्यासासाठी वेळ देत होतो. वडील नऱ्हेगाव येथील एका सोसायटीमध्ये वॉचमन म्हणून काम करतात. आई गृहिणी आहे. परीक्षेची तयारी करण्यासाठी तीन महिन्यांची सुटी घेवून मी अभ्यास पूर्ण केला.
सेल्समन, वेटर, वॉचमनची भरारी
By admin | Published: May 31, 2017 2:55 AM