पुणे : मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यात दाऊदचा साथीदार आणि जन्मठेपेची शिक्षा झालेला सलीम कुत्ता हा २०१६ पासून येरवडा कारागृहातील अंडासेलमध्ये शिक्षा भोगत असल्याचे सांगण्यात आले. विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात सलीम कुत्ता ऊर्फ मोहम्मद सलीम मीर शेख या पॅरोलवर सुटला होता. तेव्हा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी त्याच्याबरोबर पार्टी केल्याचे फोटो दाखवत भाजप आमदार नितेश राणे यांनी आरोप केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार असल्याची घोषणा केली होता.
याबाबत कारागृहातून सांगण्यात आले की, सलीम कुत्ता हा १९९३ च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २०१६ पर्यंत त्याला नाशिक कारागृहात ठेवले होते. तेथे असताना त्याला पॅरोलवर सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याला १६ डिसेंबर २०१६ पासून येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. येरवडा कारागृहात असताना त्याला पॅरोलवर सोडण्यात आलेले नाही. हे पाहता सुधाकर बडगुजर यांच्याबरोबर पार्टी करीत असल्याचा असावा असा तर्क लावला जात आहे.