पशुधन धोक्यात : उपाययोजना करण्याची पशुपालकांची मागणी
लासुर्णेे : येथे लाळ्या खुरकत रोगाने थैमान घातले असल्याने या भागातील पशुधन धोक्यात येण्याची भीती आहे. पशुसंवर्धन विभागाने त्वरित यावर उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी तसेच पशुपालकांकडून होत आहे.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करतो. परंतु या व्यवसायाला लाळ्या खुरकत रोगाने खीळ बसली आहे. या भागात लाळ्या खुरकत रोगाने या भागातील जनावरे दगावली गेली आहेत. यासाठी पशुसंवर्धन विभागाने यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, जिल्ह्यात लाळ्या खुरकत रोगाची साथ आली आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १ सप्टेंबर रोजी लसीकरणाला सुरुवात करण्याची सूचना केली आहे. तसेच जिल्ह्यासाठी १०,३१००० लस उपलब्ध आहे. हे सर्व करत असताना जरी एखादे जनावर लाळ्या खुरकत रोगाने दगावल्यास त्या पशुपालकाला जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १५ हजार मदत दिली जाणार आहे.