बारामती : संपूर्ण इंदापूर तालुका शेतीबाबत प्रगतशील आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिलं जातं. मागील काही दिवसांपासून कोरोना महामारी मुळे शेती मालाचे बाजारभाव पडले आहेत. तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात युवा शेतकरी व सुरक्षित बेकार तरुण दुध उत्पादनाचा व्यवसाय करत आहे. परंतु एक महिनाभरापासून तालुक्यात जनावरांमध्ये ‘लाळ खुरकत’ या रोगानं थैमान घातलंय. मोठ्या प्रमाणात या रोगाला जनावरं बळी पडत असल्याचं वास्तव असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
याबाबत लासुर्णे (ता.इंदापुर) येथील भाजप चे भटक्या विमुक्त आघाडीचं पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना, पशुधनविकास अधिकाऱ्यांना पत्र दिलंय. येथील कार्यालयीन अधिक्षक अशोक फलफले यांनी हे पत्र स्वीकारलं. यामध्ये वाकसे यांनी शेतकऱ्यांना दुर्दैवानं त्यांना यात प्रचंड अडचणीला तोंड द्यावे लागत असल्याचं नमूद केलंय.
या परिस्थितीमध्ये अडचणी आणखी वाढल्या आहेत. वास्तविक परिस्थितीमध्ये या साथीच्या रोगासाठी प्रशासन सज्ज असायला हवं. परंतु बहुतांश आरोग्य केंद्रात याची लसच उपलब्ध नाही. गावोगावी जाऊन लसीकरण केलेले नाही. ही बाब गंभीर आहे. पुणे जिल्ह्याच्या काही भागात लंगी या आजारानं डोकं वर काढलं आहे. या भयंकर परिस्थिती मध्ये महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा आरोग्य विभाग यांनी तत्परता दाखवत उपाययोजना करावी. अशी मागणी वाकसे यांनी केली आहे.