बारामती : येथील श्री दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ श्रावक क्षपकराज मुनिश्री 108 आल्हादसागरजी महाराज (वालचंद नानचंद संघवी (वय 98) यांची आज सल्लेखना समाधी झाली.
छत्तीसगढ मधील चंद्रगिरी तीर्थक्षेत्र डोंगरगड येथे राष्ट्रसंत संतशिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या सान्निध्यात दहा प्रतिमाधारी मुनिश्री आल्हादसागरजी महाराज यांनी मुनीश्री दिक्षा धारण करीत सल्लेखना घेतली. गेल्या 45 दिवसांपासून त्यांनी सल्लेखना धारण केली होती.
बारामतीतील सकल जैन समाजाने त्यांना धर्मसरोवरातील राजहंस अशी सन्मानाची पदवी बहाल केलेली होती. बारामती तसेच कुंथलगिरीसह इतरही अनेक धार्मिक संस्था व संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कुंथलगिरी देवस्थानच्या संस्थात्मक कामाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्विकारलेली होती.
या देवस्थानाच्या सर्वांगिण विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. बारामतीतील श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन संस्थांनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रदीर्घ काळ त्यांनी काम केले. मर्चंट असोसिएशनमध्येही त्यांनी अनेक वर्ष काम केले होते. येथील नगरसेवक संजय संघवी यांचे ते वडील होत.