पुणे : येत्या शनिवारी होणाऱ्या सलमान खानच्या कार्यक्रमामुळे परीक्षा सुरू असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी 55 डेसिबलपेक्षा अधिक क्षमतेचा ध्वनीक्षेपक बसविण्यास परवानगी देण्यात येवू नये, असे पत्र स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनला दिले आहे.
येत्या शनिवारी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे सलमान खान यांचा 'दबंग टूर' कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र त्या संदर्भात स्थानिक नगरसेवक बालवडकर यांनी आवाजाच्या संदर्भात पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या परवानगीबाबत पत्राद्वारे नाराजीही व्यक्त केली आहे. शिवजयंती, दहीहंडी, गणेशोत्सव काळात पोलिसांनी ध्वनी मर्यादा ओलांडलेल्या मंडळांवर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. अशावेळी लाखो रुपये कामावणाऱ्या आयोजकांना आश्रय दिला जातो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्या तरी 5 ते 9 वीच्या परीक्षा सुरू असल्याने परवानगी नाकारावी, असे पत्र त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहे.
याबाबत बालवडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात अशा खासगी कार्यक्रमांना परवानगी दिली जात असेल तर ते चुकीचे आहे. आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही. कार्यकर्त्यांना घेऊन बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला.