बारामती- वडगाव निंबाळकर : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सलमान खान याला पाहण्यासाठी होळ (ता.फलटण) गावामध्ये प्रचंड गर्दी उसळली होती. सलमान 'दबंग ३' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी या गावात आला होता सलमान खान गावात चित्रपटातील विविध प्रसंगाचे चित्रीकरण करण्यासाठी आला होता.चित्रपटातील प्रसंग प्रत्यक्षात आपल्या गावात ‘शुटींग’ केल्याचा गावकऱ्यांना हा पहिलाच अनुभव आहे.त्याचा आनंद लुटण्यासाठी आसपाच्या परीसरातुन ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.शिवाय सलमान खान ला जवळुन पाहण्यासाठी देखील ग्रामस्थांच्या उड्या पडल्याचे चित्र होते. यावेळी डान्सिंग स्टार प्रभुदेवा देखील ग्रामस्थांचे आकर्षण होता. 'दबंग ३' या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच होळ निरा नदीच्या पात्रात पार पडले. यावेळी सलमान सह चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभुदेवा व इतर कलाकार त्यांच्या टीमसह आले होते. चित्रीकरण पाहण्यासाठी त्या ठिकाणी नागरिक आणि चाहते मोठ्या प्रमाणावर आले होते. सुरक्षा रक्षक, पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. तरीही चाहत्यांचा उत्साह कणभर ही कमी झाला नाही. मात्र गर्दी सांभाळताना पोलिसांची दमछाक झाली. सोशल मिडीयावर सलमान खान गावात आल्याची बातमी पसरली. त्यानंतर आणखीच चाहत्यांची गर्दी वाढतच गेली. विशेष म्हणजे गर्दी मध्ये लहान मुले आणि तरुणांचा मोठा सहभाग होता. आपल्या आवडत्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी लोक अक्षरश: घरांच्या छतावर, इमारतींवर चढले होते. नागरिक शिट्या वाजवून जोर जोरात ओरडत सलमान खानला आवाज देत होते.बारामती तालुक्यातील ढाकाळे येथील युवक राहुल जगताप याच्या ओपन जीप चा (एमएच ४२ अे १९१९) देखील चित्रीकरणात वापर करण्यात आला आहे.
जानेवारी २०१९ पासुन या चित्रपटाचे लोकेशनचा शोध समन्वयक ‘मॉन्टी’ यांच्या माध्यमातुन सुरु होता. त्यांच्या ओळखीमुळे जगताप यांनी त्यांना परीसरातील लोके शन सुचविले होते.त्यानुसार परीसरात शुटींग सुरु असल्याचे जगताप यांनी सांगितले. दरम्यान मंगळवारी(दि १६) देखील बारामती तालुक्यातील पणदरे परीसरात चित्रपटातील सलमानवरील काही प्रसंगाचे चित्रीकरण पार पडले.फलटण परीसरात आणखी काही दिवस चित्रपटाचे चित्रीकरण सुरु राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. या चित्रपटामध्ये सलमान खानसह अरबाज खान,सोनाक्षी सिन्हा,महेश मांजरेकर आणि त्यांच्या मुलीच्या भुमिका आहेत.