कोरेगाव भीमा : श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजीमहाराजांच्या ३२८व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त शासकीय मानवंदना, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, धर्मसभा व पालखी सोहळा, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून लाखो शंभुभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे कार्यवाह मिलिंंद एकबोटे व ग्रामपंचायतीच्य सरपंच रेखा शिवले व उपसरपंच संजय शिवले यांनी दिली. श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजीमहाराजांच्या ३२८व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त दि. २७ रोजी छत्रपती संभाजीमहाराज, कवी कलश व वीरपुरुषांच्या समाधींना महाअभिषेक सकाळी ६ वाजता होणार आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने महिनाभर पाळण्यात येणाऱ्या बलिदान मासाची सांगता मूक पदयात्रेने सकाळी ७ वाजता होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न होणार आहे. सकाळी ९ वाजता पोवाडा व शस्त्र प्रदर्शन तर शंभुछत्रपतींच्या समाधीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी व त्यानंतर शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर धर्मसभा व पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे. बलिदान स्मरण दिनाची वढू बुद्रुक ग्रामपंचायतीकडूनही विशेष तयारी सुरू आहे. सकाळी समाधिस्थळी होणाऱ्या शासकीय पूजेला जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, तहसीलदार राजेंद्र पोळ व गटविकास अधिकारी संजय जठार हे उपस्थित राहणार आहे. बलिदान स्मरण दिनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजी महाराज भोसले, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार बाबूराव पाचर्णे, सभापती सुभाष उमाप, उपसभापती मोनिका हरगुडे आदी उपस्थित राहणार असल्याचे सरपंच सरपंच रेखा शिवले व उपसरपंच संजय शिवले यांनी सांगितले. तर गतवर्षी प्रमाणेच याही वर्षी बलिदान स्मरणदिनी पोलीस दलाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात येणार असल्याचे धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे सचिन भंडारे यांनी सांगितले. (वार्ताहर)
बलिदान स्मरणदिनी शासकीय मानवंदना
By admin | Published: March 26, 2017 1:24 AM