लोणीकंद : पुणे-नगर रस्त्यावरील पेरणे फाटा येथील कोरेगाव भीमा विजयस्तंभ या ऐतिहासिक स्थळी दलित शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष, संघटनांचे नेते व लाखो बांधवांनी मानवंदना दिली. १ जानेवारी १८१८ रोजी पेशवे व ब्रिटिश यांच्यामध्ये युद्ध झाले. यात ब्रिटिश विजयी झाले. त्या प्रीत्यर्थ ब्रिटिशांनी विजय स्तंभ उभारला. १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली. तेव्हापासून १ जानेवारी रोजी राज्यातील दलित बांधव या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत असतात. या निमित्त विजयस्तंभ व परिसराला फुलांची सजावट केली आहे. प्रवेशद्वार जाण्या-येण्याचे रस्ते व विजयस्तंभ संपूर्ण फुलांनी सजवून आकर्र्षित केला होता. भारतीय बौद्ध महासंघ अध्यक्ष मिरा आंबेडकर, कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर, समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे, रिपब्लिकन सेना आनंदराव आंबेडकर, पिपल्स रिपब्लिकन पार्र्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, भारतीय दलित कोब्राचे अध्यक्ष विवेक चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, भिमशक्ती युवा सेना अध्यक्ष विलास इंगळे, बहुजन समाज पार्र्टीचे अध्यक्ष विलास गरुड, जिल्हा अध्यक्ष बाळासाो आवारे आदींनी समर्थकांसह मानवंदना देऊन स्वतंत्र अभिवादन सभा घेतल्या. भारतीय बौद्ध महासंघ प्रणित समता सैनिक दलाने शिस्तबद्ध कवायत करुन सलामी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वशंज व भारतीय बौद्ध महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मिरा आंबेडकर यांनी सलामी स्वीकारुन मानवंदना देऊन पुष्पचक्र वाहिले. यावेळी मनिषा आंबेडकर पुणे जिल्हा अध्यक्ष विजयराव गायकवाड, उत्तम मगरे, अशोक कदम, दादासाहेब भोसले आदी सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी विजय रणस्तंभ सेवा संघ यांच्या वतीने रात्री १२ वाजता विजयोत्सव साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व त्याचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले. पुणे-नगर रस्ता गर्दीने भरुन गेला होता. जड वाहनांना बंदी केली होती तर पुण्याकडे जाणारी वाहने शिक्रापूर येथून तर पुणेहून नगरकडे जाणारी वाहने वाघोली येथून अन्यत्र वळवली होती. तुळापूर फाटा ते कोरेगाव भिमापर्यंतचा रस्ता वाहनमुक्त होता. तरीही रस्त्यावर नागरिकांची प्रचंड गर्दी केली होती. विजय स्तंभाच्या पाठीमागे विविध पुस्तकाचे स्टॉल व खाद्य पदार्थांचे स्टॉल लागले होते. तसेच पाळणे, खेळणी यामुळे जत्रेचे स्वरुप आले होते. या कार्यक्रमासाठी एक पोलीस अधिकारी, चार उपविभागीय अधिकारी, आठ निरीक्षक, २० उपनिरिक्षक, ४०० पोलीस, १०० होमगार्ड राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या दंगल नियंत्रक पथक आदी बंदोबस्त तैनात होते.
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास लाखोंनी दिली मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 6:43 PM
पुणे-नगर रस्त्यावरील पेरणे फाटा येथील कोरेगाव भीमा विजयस्तंभ या ऐतिहासिक स्थळी दलित शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष, संघटनांचे नेते व लाखो बांधवांनी मानवंदना दिली.
ठळक मुद्देभारतीय बौद्ध महासंघ प्रणित समता सैनिक दलाने शिस्तबद्ध कवायत करुन दिली सलामी पुणे-नगर रस्ता गर्दीने गेला होता भरुन, पाळणे, खेळणी यामुळे जत्रेचे स्वरुप