लोणावळा : कोरोना काळात 'खाकी वर्दी' आपला जीव धोक्यात घालून दिवस रात्र एकनिष्ठतेने आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे.तर काही ठिकाणी या पोलिसांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत मदत करताना अनेक जणांना वेगवेगळ्या संकटातून बाहेर देखील काढले तर कधी वेळेवर दवाखान्यात पोहचवत बऱ्याच घटनांमध्ये रुग्णांचे प्राण देखील वाचविले. पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविताना लोहमार्ग पोलिसांनी जांबरूंग रेल्वे ट्रॅक जवळ जखमी अवस्थेत पडलेल्या एका महिलेला तब्बल ४ किमी अंतरापर्यत झोळीमध्ये उचलून नेवुन तिचे प्राण वाचविले. या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसांवर सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. ही घटना ३१ मे रोजी घडली.
पुणे लोहमार्ग विभागाचे पोलीस अधिक्षक सदानंद वायसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा स्टेशन मास्तर यांनी सोमवारी (दि. ३१) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जांबरूंग रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एक महिला जखमी अवस्थेत पडलेली आहे. ही माहिती समजताच वायसे पाटील यांनी तत्परता दाखवत लोणावळा लोहमार्ग दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक गोसावी व पोलीस नाईक जाधव यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमीस वैद्यकीय उपचार मिळवून देण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे लोहमार्गचे पोलीस नाईक जाधव व चार हमाल असे कर्जत रेल्वे स्टेशनकडे जाणार्या रेल्वे मालगाडीच्या इंजिनमध्ये बसून घटनास्थळी रवाना झाले. तोपर्यंत लोहमार्ग पुणे जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कर्जत लोहमार्ग पोलीस ठाणे हे घटनास्थळावरून जवळ असल्याने कर्जत रेल्वे स्टेशन येथे संपर्क करून तात्काळ जखमीस मदत मिळण्याबाबत संपर्क केला. त्यामुळे कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गांगुर्डे, पोलीस शिपाई तुर्डर, पोलीस शिपाई गायकवाड व एक होमगार्ड असे घटनास्थळी पोहचले. तेथे काहीएक वाहतुकीचे साधन नसताना या कर्मचाऱ्यांनी जखमी महिलेला झोळीमध्ये उचलुन खांदयावर घेत तब्बल ४ किलोमीटर अंतर चालत पार केले.
त्यानंतर पळसदरी रेल्वे स्टेशन येथून रुग्णवाहिकेतून जखमी महिलेला कर्जत येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तोपर्यंत लोणावळा लोहमार्गचे पोलीस नाईक जाधव हे देखील तेथे पोहचले. सदर जखमी महिलेच्या मणक्याला मार लागल्याने पुढील उपचारासाठी तत्काळ पुण्याच्या ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. औषधोपचारानंतर ही महिला आता ठणठणीत बरी झाली आहे.
आशा दाजी वाघमारे (वय 42 वर्षे, रा. ता. मावळ) असे या महिलेचे नाव असून तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधत त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.ही महिला जांबरूंग येथे रेल्वे लाईन ओलांडत असताना धावत्या रेल्वेगाडीची धडक लागल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक जाधव करत आहेत.