पुणे : पोलीस स्मृतिदिनानिमित्त विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रातील पोलीस हुतात्मा स्मृति स्मारकावर बुधवारी पोलीस दलाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, बिनतारी संदेश विभागाचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महासंचालक प्रदीप देशपांडे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, जालींदर सुपेकर, डॉ. संजय शिंदे, नामदेव चव्हाण, ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व अन्य मान्यवरांच्या हस्ते पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी शोक कवायतीचे आयोजन करण्यात आले होते.शोक कवायतीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील प्रत्येकी एक प्लाटुनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी व सेकंड कमांडर पोलीस निरीक्षक रामकृष्ण गोटमवाड यांनी कवायतीचे नेतृत्व केले. गेल्या वर्षभरात शहीद झालेल्या २६४ जवानांच्या नावाच्या यादीचे वाचन सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख व गजानन टोम्पे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण, बिनतारी संदेश विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग, मोटार परिवहन विभागातील ९५ वरिष्ठ पोलीस अधिकारी व ११५ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.