- शिवानी खोरगडेपुणे - धष्टपुष्ट असूनही बरेचजण भीक मागताना दिसतात. पण पुण्यातील एक दृष्टिहीन जोडप्यानं ही लाचारी स्वीकारली नाही. बाजीराव रस्त्यानं जाताना शनिपार सिग्नलच्या १५-२० पाऊलं आधी डाव्या हाताला पदपथावर हे स्वाभिमानी जोडपं फुटपाथवर बसलेलं दिसतं. दोघांनाही दृष्टी नाहीये. रस्त्याच्या विरुद्ध दिशेला काही धष्टपुष्ट लोक मात्र भीक मागताना दिसतात. पण हे जोडपं कधीच येणाऱ्या जाणाऱ्यांकडे हाथ पसरत नाहीत. ते वजनकाटा घेऊन बसतात. आणि आपला उदरनिर्वाह करतात. पण उन्हाचं असं फुटपाथवर बसणं कितीही कष्टदायक होत असलं तरी त्यांनी स्वाभिमानानं जगता यावं म्हणून ही मेहनत स्वीकारली आहे.
विशाल कांबळे आणि काजल कांबळे असं त्यांचं नाव. पुण्यातील हडपसर परिसरात ते राहतात. त्यांना एक संग्राम हा मुलगा पहिलीत आणि एक मुलगी सहावीत आहे. विशाल यांचं शिक्षण अर्धवट राहीलं. तरी त्यांच्या बोलण्यातून ते शिक्षित असल्याचं जाणवतं. दृष्टी नसली म्हणून काय झालं, मेहनत ही केलीच पाहिजे, असं या जोडप्याचं म्हणणं आहे. ते रस्त्यावर बसतात म्हणून कधी कधी लोक त्यांना भिकारी समजून शिळं अन्न देऊन जातात. पण जे लोक धष्टपुष्ट आहेत तरी भीक मागतात त्यांच्याकडे बघून लोकांना गैरसमज होतो आणि म्हणून आम्हालाही तशीच वागणूक मिळते, असा खेद विशाल यांनी व्यक्त केला.
काजल कांबळे सांगतात, ''माझ्या मुलाला पोलिस किंवा आर्मीत जायचंय. पण तो आम्हाला एकुलता एक असल्यानं मी त्याला नाही म्हणते. सध्या तोच आमचा आधार आहे. माझ्या मुलीला डॉक्टर व्हायचंय. आमच्यासारख्या दृष्टिहीन लोकांसाठी कमी दरात तिला योग्य उपचार मिळवून द्यायचे आहेत असं माझ्या मुलीचं स्वप्न आहे.''
https://www.facebook.com/LokmatPune/videos/291705852304494/
विशाल हे पूर्वी आलेपाकचा व्यवसाय करायचे. नंतर ते वजनकाटा घेऊन बसू लागले. हडपसरला ते एका खोलीत राहतात. ज्याचं भाडं साडेतीन हजार रुपये आहे. मोठ्या मुश्कीलीने महिन्याकाठी सहा हजार रुपयांपर्यंत ते वजनकाट्यातून कमावतात. त्यात घरभाडं, महिन्याचा किराणा, हडपसर ते शनिपार प्रवासाचा खर्च यातच सगळे पैसे संपतात. हाती एक पैसाही शिल्लक राहत नाही. दोन्ही मुलांना शिक्षणासाठी हॉस्टेलवर त्यांनी ठेवलंय. पण सध्या शाळाच बंद असल्यानं लहान मुलगा हा सतत आई-बाबांना बिलगूनच असतो. कांबळे कुटुंबाने ज्याप्रकारे स्वाभिमान जपलाय तो खरंच वंदनीय आहे.---------------------------------