- रोशन मोरे
पिंपरी : पायाने ७५ टक्के दिव्यांग. चालताना प्रचंड त्रास. मात्र, तीच मुलगी स्विमिंग टँकमध्ये उतरली की जलपरी बनते. स्विमिंगची अशी कोणती स्पर्धा नाही की त्याच्यामध्ये तिने सुवर्ण यश मिळवले नाही. सलग नऊ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, कॉमनवेल्थ गेम्स २०१८, पॅरा स्विमिंग चॅम्पनशिप तसेच अमेरिका, ऑस्ट्रोलिया,दुबई, येथे झालेल्या आंतराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन यश मिळवले. धडधाकट खेळाडूला ही लाजवेल अशी कामगिरी आहे पॅरालिंपीक जलतरणपटू वैष्णवी विनोद जगताप हिची आहे.
वैष्णवीला नुकताच राज्य सरकारकडून सर्वाच्च शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मात्र, तिचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. संघर्षातून तिने यश खेचून आणले. वैष्णवी ही जन्मापासूनच दिव्यांग आहे. स्पायना बायफिडा या आजाराने ती ग्रस्त आहे. फिजोओथेरपीसने सांगण्यावरून उपचाराचा भाग म्हणून तिला ती तीन वर्षांची असताना तिचे आई वडिलांनी तिला स्विमींगसाठी घेऊन गेले. आणि पुढे तिला स्विमींगमध्ये प्रशिक्षित करणारे अभिजित तांबे सर भेटले. तेथूनच तिचा खेळाडू बनण्याचा प्रवास सुरु झाला.आई-वडिलांकडून प्रोत्साहन-
वैष्णवी सांगते की ती दिव्यांग आहे म्हणून तिला वेगळी वागणूक आणि तिच्या बहिणीला वेगळी वागणूक, असे घरात कधीच झाले नाही. चांगल्या कामगिरीचे कौतुक आणि चुक झाली की ओरडा ही ठरलेलं. आपल्या मम्मी-पप्पांनी आपल्याला स्विमिंगच्या स्पर्धेसाठी प्रेरित केले. मी डेक्कन येथील टिळक टँकमध्ये प्रॅक्टस करते मला पप्पाच तेथे सोडण्यासाठी येतात.
खर्चाचा सर्व भार कुटुंबावर-
वैष्णवी हिने राष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तरावर चमकली असली तरी तिला अजूनही कुठलेही प्रायोजकत्व मिळालेले नाही. तिच्या सर्व खर्चाचा भार हे तिचे कुटुंबीयच उचलतात. वैष्णवी हिने सरकारी नोकरीसाठी खेळाडूंच्या कोटातून क्लेम करून ठेवले आहे. नुकतीच त्याविषयीची पुढील कागदपत्रे देखील तिने संबंधितांना दिली आहेत.
२०१२ मध्ये मी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले. तेथे मिळालेल्या यशाने मला माझ्या क्षमतांची जाणीव झाली. आता माझे सारे लक्ष्य हे एशियन्स गेम्सच्या तयारीमध्ये आहे. माझ्या यशाचे सारे श्रेय हे मम्मी, पप्पा आणि माझे प्रशिक्षक अभिजित तांबे यांचेच आहे. त्यांच्याच प्रोत्सानामुळे ही चांगली कामगिरी करु शकले. - वैष्णवी जगताप, आंतराराष्ट्रीय पॅरालिंपीक जलतरणपटू