पुणे : वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी औक्षणाचा कार्यक्रम होता. त्यासाठी ते निघाले. त्याचवेळी कोंढव्यातील कौसरबाग येथे भंगार मालाच्या गोदामाला आग लागल्याची वर्दी आली. तेव्हा वाढदिवस बाजूला ठेवून जवान दशरथ माळवदकर हे आग विझविण्यासाठी धावून गेले.
कौसरबाग परिसरातील गोदामाला शनिवारी सकाळी आग लागली. रहिवाशांनी त्वरित या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. आग भडकल्याने जादा कुमक मागविण्यात आली. अग्निशमन दलाची आठ पथके व बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. गोदामाबाहेरून शिड्या लावून जवान आत उतरले. गोदामात कोणी अडकले आहे का, याची पाहणी जवानांनी केली. त्यानंतर गोदामाच्या चारही बाजूंनी पाण्याचे फवारे मारून आग पूर्णपणे आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. तेथील साहित्य व भंगार माल आणि चारचाकी वाहने जळाली.
कोंढवा अग्निशमन केंद्रातील जवान माळवदकर कामावर निघाले होते. वाढदिवसानिमित्त घरी त्यांच्या औक्षणाचा कार्यक्रम होता. त्यांना आगीची माहिती मिळाली. त्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी केलेल्या मदत कार्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले, तसेच सहकाऱ्यांनी घटनास्थळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.