बारामती: पुणे शहरासह जिल्ह्यातील इंदापूर, बारामती भागात बुधवारी परतीच्या मुसळधार पावसाने थैमान घातले. त्यामुळे नद्या, ओढे यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले. यात काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले. यात पुराचा धोका ओळखून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पण बारामती तालुक्यातील सोनगाव येथील सोलनकर वस्तीला चोहोबाजूने कऱ्हा व नीरा नदीच्या महापुराचा वेढा बसला.
बारामती तालुक्याच्या पूर्व पट्यातील मेखळी परिसरात (ता.१४) रोजी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून कऱ्हा व नीरा नदीला महापूर आला आहे.सोनगाव येथील सोलनकर वस्तीवरील पुराच्या पाण्यात अडकलेल्या शोभा विशाल सोलनकर या आई व त्यांच्या दोन महिन्यांच्या बाळासह २० हून अधिक नागरिकांना रेस्क्यू टीमने अथक प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले.
सोनगाव येथे कऱ्हा आणि नीरा दोन्ही नद्यांचा संगम होत असल्याने याठिकाणच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.त्यामुळे गावातील ५० हून अधिक घरे पाण्यात होती. मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे कोणाचेही फोन लागत नव्हते. अशावेळी माजी सरपंच विकास माने यांनी आमदार रोहित पवार यांना फोनवरून घटनेची माहिती दिली .त्यावर आमदार पवार यांनी तातडीने सूत्रे हलवली. अवघ्या अर्ध्या तासात पोलिस यंत्रणा पोहचली.त्यानंतर रेस्क्यु टीमला पाचारण करण्यात आले .त्यानंतर तात्काळ मदत मिळाल्याने बाळासह इतरांसमोर येणारा गंभीर प्रसंग टळला.