पुणे : असीम कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घालणाऱ्या महिलांना सलाम करण्यासाठी लोकमत माध्यम समूहाने राष्ट्रीय पातळीवर सुरू केलेल्या यूएसके फाउंडेशन प्रस्तुत ‘लोकमत वुमेन समिट’ या चळवळीचे चौथे पर्व मंगळवार दि. २ डिसेंबरला पुण्यात हॉटेल हयात येथे होणार आहे. या राष्ट्रीय परिषदेमध्ये विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या महिलांच्या शौर्याला सलाम करण्यात येणार आहे. तसेच महिला सक्षमीकरणाबाबत विविध विषयांवर विचारमंथनही केले जाणार आहे.या परिषदेच्या मानचिन्हाचे अनावरण नुकतेच यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा व निपसिडच्या उपाध्यक्षा उषा संजय काकडे व प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते झाले. महिलांच्या शौर्याला सलाम करण्याबरोबरच त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांचा आवाज देशभरातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमत माध्यम समूहाने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. विविध क्षेत्रांतील महिलांकडून या चळवळीला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे या राष्ट्रीय परिषदेने महिला सक्षमीकरणामध्ये आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. गेले तीन वर्षे सातत्याने विविध राष्ट्रीय पातळीवरील महिला सक्षणीकरणासाठी काम करणाऱ्या महिला या समिटमध्ये सहभागी झाल्या आहेत. याच यशोगाथेचा पुढचा टप्पा म्हणजे परिषेदचे चौथे पर्व आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेचे सहयोगी प्रायोजक अजमेरा हाउसिंग कार्पोरेशन व सहप्रायोजक डब्ल्यू. एस. बेकर्स हे आहेत. (प्रतिनिधी)महिलांच्या शौर्याला सलाम करणारी ‘वुमेन समिट’ अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. लोकमत माध्यम समूहाने उभी केलेली ही चळवळ भविष्यात महिलांच्या सबलीकरणासाठी निश्चितच महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वास आहे. या समिटमधील निघणाऱ्या निष्कर्षामुळे अनेकांना नवी दिशा मिळेल.- माधुरी दीक्षित, प्रसिद्ध अभिनेत्री