रावेत : सध्या शाळांना सुट्या पडल्या आहेत. मुले नेहमीच्या अभ्यासाच्या ‘कटकटी’मधून बाहेर पडून निवांत आहेत. परंतु, शालेय अभ्यासातून सुटका झालेल्या मुलांना सर्वच क्षेत्रात ‘सर्वज्ञ’ करण्याच्या पालकांच्या हट्टापायी विविध शिबिरांची वाट धरावी लागत आहे. आपला पाल्य कोणत्याही बाबतीत मागे राहू नये, असा अट्टहास धरून हजारो रुपयाची गुंतवणूक करून पालक आपल्या पाल्याला समर कॅम्पच्या दारात नेऊन सोडत आहेत. यातून समर कॅम्पचालकांचा धंदा जोरात असून, एकेकाळी संस्कार शिबिराच्या नावे सुरू झालेल्या या उपक्रमाचे रूपांतर मोठ्या उद्योगात झाले आहे. आपल्या पाल्यावर संस्कार घडविण्याऱ्या या कॅम्पबद्दल तितकेच जागृत असण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्या म्हणजे मुलांना वेध लागायचे ते मामा, काका, मावशीच्या गावाला जाण्याचे. वर्षभराच्या अभ्यासामुळे आलेला शिणवटा घालण्यासाठी मुलांची पावले साहजिकच गावाकडे वळायची. मात्र अलीकडच्या आधुनिकतेची झालर लावलेल्या काळात शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे निष्पाप मुलांचे खेळण्या-बागडण्याचे दिवस संपून गेले की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हल्ली मुलांकडे लक्ष देण्यासाठी पालकांना वेळ नसल्याने समर कॅम्पवाल्यांचे फावते आहे. यामुळे शहरात गल्लोगल्ली समर कॅम्पचे फलक लागलेले दिसून येत आहेत.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हटले जाते. याचा सर्वसाधारण अर्थ लहानपणी केलेल्या संस्कारातूनच त्याचे भवितव्य घडत असते. यासाठी लहान वयात संस्कार घडविण्याचे काम करण्यात येते. या समजुतीतून २५-३० वर्षांपूर्वी संस्कार शिबिराचा उदय झाला. लहान मुलांवर शहाणपणाच्या चार गोष्टी शिकविण्याचे, त्यांच्यावर साहस, कला, वैयक्तिक आवडी-निवडी, छंद यांची जोपासना करण्याचे काम करण्यात येत असे. यामुळे शहरातील काही मोजक्या पालकांकडून प्रतिसाद लाभत असे. त्यानंतर मात्र या संकल्पनेत झपाट्याने बदल झाला. सुरुवातीला सेवाभावी उपक्रम म्हणून सुरु केलेल्या उपक्रमाचे उद्दिष्ट बदलत गेले. यातून पैसा कमाविण्याची सुपीक आयडिया संचालकांच्या मनात आली. अशा शिबिरांसाठी पालकांना आपला खिसा रिकामा करावा लागतो. काही वर्षांपूर्वी उन्हाळी शिबिर म्हटले, की चित्रकला, हस्तकला, पोहणे, विविध खेळ, अभिनय, श्लोकपठण, पाठांतर यावर भर दिला जायचा. विशेषत: अभिनय, चित्रकला, नृत्य या प्रकारांना हमखास प्रतिसाद लाभायचा. साहसी प्रकारात जंगल भटकंती विशेष ठरायची. शहरातील मुलांना निसर्ग, वन्यप्राणी, नदी, नाले, वृक्षराजी साद घालायची. काही ठराविक रक्कमेत अथवा काही सामाजिक संघटनाकडून शिबिरांचे आयोजन केले जात असे. आताच्या संगणकीय आणि मोबाइलच्या पिढीतल्या मुलांच्या आवडीनिवडीचे प्रतिबिंब या शिबिरामध्ये पाहायला मिळू लागलेय. नेहमीच्या ठरावीक शिबिरांबरोबरच करिअरविषयक आणि तंत्रज्ञानविषयक कार्यशाळांना पाठविण्याकडे पालकांचा कल वाढू लागला आहे. इंग्लिश स्पीकिंग, कॉम्युटरसारख्या विषयावर वाहिलेल्या शिबिरांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. काही शिबिरे ही निवासी असतात. यासाठी हजारो रुपयांपर्यंत फी आकारण्यात येते. काही ठिकाणी भपकेबाजी करुन वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन सुरू करण्यात येणाऱ्या शिबिरांतून चांगला अनुभव येतोच, असे नाही. यासाठी पालकांनी सतर्क राहूनच शिबिरांची निवड करणे सोयीस्कर ठरते. (वार्ताहर)तणावमुक्तीसाठी...शाळेच्या धाकामुळे झोप न होणाऱ्या पोरांना सकाळी उशिरापर्यंत निवांत झोपू द्या.मुलांना स्वत:जवळून निदान दोन महिने तरी दूर करू नका.त्यांना प्रत्येक गोष्टीत सहभागी करा.जुन्या-पुरान्या पुस्तकांतूून कात्रीने चित्र कापू द्या.१५ दिवसांत २००० खर्च करण्यापेक्षा २०० रुपयांचे कोरे कागद, ओतीव कागद, रंगकांड्या, गोष्टीची पुस्तके, क्ले आणून त्यांच्या पुढ्यात टाका.घरी बिनधास्त उड्या मारू द्या. खोड्या करू द्या. मामाचे, मावशीचे गाव लोप पावले असले, तरी चार दिवस अवश्य जाऊ द्या.रात्री घराच्या गच्चीवरच का असेना, अंथरूण टाकून रात्रीचे चांदणे न्याहाळू द्या. वर्षानुवर्षे लागणारा व्यक्तिमत्त्व विकास अवघ्या १५ दिवसांतच होणार का?सुरुवातीपासूनच कच्चे असलेले गणित १५ दिवसांतच पक्के होणार का ?वेदपठण, नृत्य हे वर्षभरच चालतात. मग १५ दिवसांतच मुलांना यात पांडित्य प्राप्त होईल का?पाठ आणि पोट एकच झालेल्या पोरांना भर उन्हात पाठवून आणखी कुपोषित करणार का ? या प्रश्नांचा विचार पालकांनी करावा.
शहरात ‘समरकॅम्प’चा धंदा आला तेजीत
By admin | Published: May 04, 2017 2:33 AM