लोकमत न्यूज नेटवर्क
आंबेठाण : चाकण औद्योगिक वसाहतीमधील सावरदरी येथील जी.ई कंपनीत सांबर घुसल्याची घटना बुधवारी (दि २३) घडली. बघ्यांची गर्दी तसेच कंपनीतील यंत्रामुले सांबराच्या जिवास धोका निर्माण होऊ शकतो, यासाठी वन विभागाच्या बचाव पथकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने नर सांबरास पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुरक्षितपणे ताब्यात घेऊन करंजविहिरे येथे नैसर्गिक अधिवासामध्ये सोडले.
चाकण औद्योगिक वसाहतीमधील जीई इंडिया ही कंपनी साधारणतः चोवीस एकर क्षेत्रात वसलेली आहे. औद्योगिक वसाहतीच्या जवळपास भामचंद्र डोंगर व जवळच भामा आसखेड जलाशय आहे. भामचंद्र डोंगर रांगा अगदी वासुली, शिंदे, करंजविहिरे, शिवे, वहागाव, गडदच्या पुढेही विस्तिर्ण पसरलेला आहे. यामुळे या डोंगरावर मोठ्या संख्येने झाडी असल्याने या ठिकाणी सांबर, माकड, वानर, लांडगे, कोल्हे आदी वन्यप्राण्यांसह मोर, पोपट विविध पक्षांचा नेहमीच वावर असतो. मात्र वाढत्या औद्योगिक क्षेत्राने संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहे. यामुळे हे सांबर भरकटुन मानववस्तीकडे आले असावे असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
करंजविहिरे येथील डोंगरावर वन विभागाच्या हद्दीत यापूर्वी अनेकदा सांबर आढळून आले आहेत. यातीलच एक सांबर भरकटुन भामचंद्र डोंगर मार्गे औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत घुसले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. संबधित कंपनीस आरसीसी वॉल कम्पाउंड व त्यावर तारेचे कुंपण असल्याने सांबरास बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही. कंपनीच्या परिसरात ते घुटमळत असल्याचे सुरक्षारक्षकाने कंपनीच्या वरिष्ठांना सांगितले. त्यानंतर त्यांनी चाकण वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. उपवन संरक्षक जुन्नर जयारामे गौडा, सहाय्यक वनसंरक्षक एस.बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे डॉ. निखिल बनगर, पशुवैद्यकीय अधिकारी कोकणे, चाकण वनपरिक्षेत्राचे योगेश महाजन, जीई इंडिया कंपनीचे अधिकारी तसेच चाकण येथील वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य मनोहर शेवकरी, अतुल सवाखंडे, रत्नेश शेवकरी आदींच्या मदतीने दिवसभराच्या अथक प्रयत्नानंतर संध्याकाळी सांबरास पकडण्यास यश आले. त्यानंतर सुरक्षितपणे करंजविहिरे येथील वनविभागाच्या हद्दीत सांबराला सोडण्यात आले.
फोटो - सावरदरी येथील कंपनीतील सांबर.