पुणे : श्री शिवप्रतिष्ठानतर्फे यंदाही वारकरी-धारकरी संगमाचे नियोजन करण्यात आले असून, संभाजी भिडे आपल्या कार्यकर्त्यांसह त्यात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यात तीक्ष्ण शस्त्रे घेऊन सहभागी होऊ नये, अशी नोटीस पुणे पोलिसांनी शिवप्रतिष्ठानला बजावली आहे. दरम्यान, धारक-यांनी शस्त्र घेऊन सहभागी होऊ नये, असे आवाहन प्रतिष्ठानने देखील केले आहे.गेल्या वर्षी पालखी सोहळ्यात श्री शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते तलवारी घेऊन सहभागी झाले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी पुण्यात दाखल होणार आहे. जंगली महाराज मंदिरात दुपारी दोन वाजल्यापासून धारकरी जमा होणार आहेत. यानंतर चार वाजता संभाजी भिडे धारकºयांना मार्गदर्शन करून संचेती चौकात पालखीच्या स्वागतासाठी जातील. तेथे प्रथम तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यावर पालखीचे दर्शन घेतील. त्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले जाईल. श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाल्यावर त्यामागे धारकरी डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत चालत जाणार आहेत.पोलिसांनी शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संजय जढर यांना नोटीस पाठविली आहे. शिवप्रतिष्ठानने पालखीची परंपरा मोडत १८ जून २०१७ रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी थांबविली होती. हा प्रकार तीन वर्षांपासून सुरू असून, त्यांना प्रतिबंध करण्याचे पत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने पोलिसांना दिल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे. या यंदा पालखी सोहळ्यात साध्या वेशातील पोलिसांचे पथक सहभागी होणार आहे.
संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांवर पोलिसांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 2:26 AM