पुणे : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर विनायक कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचे नाव कोरेगाव-भीमा दंगलीच्या खटल्यातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे न आढळल्याने भिडे यांचे नाव वगळल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगाला दिली.
कोरेगाव-भीमा दंगलीमध्ये संभाजी भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली होती. याप्रकरणात ४१ आरोपींवर वर्षभरापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये संभाजी भिडे यांचे नाव नसल्याची माहिती पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगासमोर असलेल्या सुनावणीदरम्यान दिली. ठाण्यातील ॲड. आदित्य मिश्रा यांनी संभाजी भिडे यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी होत नसल्याचे सांगत त्यातून यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आयोगाकडे केली होती.
त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव दंगल प्रत्यक्ष संबंध आढळून येत नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचं नाव खटल्यातून वगळण्यात आल्याचा लेखी अहवाल दिला आहे. १ जानेवारी २०१८ ला कोरेगाव-भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने संभाजी भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
संभाजी भिडे हे गुन्हा घडल्याच्या वेळी सांगली जिल्ह्यात उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणतेही दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दिली असल्याचे भिडे यांचे वकील ॲड. पुष्कर दुर्गे यांनी दिली आहे.