पुणे :औरंगाबादमधील सभेत शिवछत्रपतींच्या समाधीसंदर्भात चुकीचा इतिहास सांगितला, यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी व त्यांच्यावर यासाठी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.
ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर म्हणाले, औरंगाबादमधील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, असे सांगितले. आता खुद्द टिळक कुटुंबीयांनीच हा दावा चुकीचा असल्याचे सांगितले. अशा प्रकारचा चुकीचा इतिहास सांगणे राजद्रोहच आहे. तो ठाकरे यांनी केला. त्यामुळे ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केलीय.
पुढे बोलताना पासलकर म्हणाले, शिवरायांच्या मृत्यूनंतर ही समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली. पेशवाईत समाधीकडे दुर्लक्ष झाले. महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन समाधीचा शोध घेतला. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी समाधीचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले व तसे नियोजन केले. खरा इतिहास हा असा असतानाही राज यांनी चुकीच्या गोष्टी सांगितल्या.