पुणे : लाेकसभेची निवडणूक जवळ आल्याने सर्वच पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. त्यातच पुण्याच्या जागेला अधिक महत्त्व असल्याने सर्वच पक्ष तगडा उमेदवार देण्याचा विचार करत आहेत. त्यात भाजपाचे सहयाेगी खासदार संजय काकडे हे पुण्यातील लाेकसभा लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वीच काॅंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घाेषणा केली आहे. परंतु काॅंग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा आयात उमेदवाराला विराेध असल्याने काकडेंना काॅंग्रेेसकडून उमेदवारी मिळणार का याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे यंदा पहिल्यांदा निवडणूकीत उतरलेल्या संभाजी ब्रिगेडकडून काकडेंना निवडणूक लढविण्याची ऑफर देण्यात आली आहे.
पुण्यातल्या लाेकसभेच्या जागेसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे हे इच्छुक आहेत. संभाजी ब्रिगेड राज्यातल्या 12 ते 13 जागा लढविण्याची शक्यता आहे. संजय काकडे हे जर संभाजी ब्रिगेडकडून निवडणूक लढविणार असतील तर संताेष शिंदे आपली उमेदवारी मागे घेण्यास तयार आहेत. काकडेंची फरफट पाहवत नसल्याने त्यांनी संभाजी ब्रिगेकडून निवडणूक लढविण्याची ऑफर शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे. काकडे उभे राहिल्यास ब्रिगेडची निष्ठावंत ताकद त्यांच्या मागे उभी राहील असेही शिंदे यांनी जाहीर केले आहे.
पुण्याचे विद्यमान खासदार भाजपाचे अनिल शिराेळे हे पुन्हा लाेकसभा लढण्यास इच्छुक आहेत. त्याचबराेबर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट तसेच शहराध्यक्ष याेगेश गाेगावले हे सुद्धा उत्सुक असल्याची चर्चा आहे. त्यातच काॅंग्रेसचे माेहन जाेशी, उल्हास पवार, अभय छाजेड आदी निष्ठावंत कार्यकर्ते लाेकसभा लढविण्यास उत्सुक आहेत. परंतु काॅंग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रविण गायकवाड सुद्धा प्रयत्न करत आहेत. काकडे सध्या राज्यसभेचे भाजपाचे सहयाेगी खासदार आहेत. ते यंदा लाेकसभा लढविण्यास उत्सुक आहेत. भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यानी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घाेषणा त्यांनी केली आहे. परंतु असे असले तरी आयात उमेदवार उभा करण्यास काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा विराेध असल्याने काकडेंच्या काॅंग्रेसकडूनच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे काकडेंना भाजपा आणि काॅंग्रेसकडे उमेदवारी न मागता त्यांनी संभाजी ब्रिगेडकडून निवडणूकीत उतरण्याची ऑफर त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता काकडे या ऑफरला काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.