पुणे - शिवजयंतीच्या दिवसाचा मुहूर्त साधून खेड येथील तरुणाने पुण्यातील संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची घटना पुण्यात सकाळी घडली. अचानक ही घटना घडल्याने पोलिसांची धावपळ उडाली असून शहरात पोलीस सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संभाजी बागेत बसवावा ही मागणी गेले अनेक वर्ष मागणी होत होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ भाजपच्या सत्ताधाऱ्यांनीही या मागणीची अंमलबजावणी करण्यात रस दाखवला नव्हता. अखेर खेड येथे राहणाऱ्या गणेश कारले या युवकाने हा पुतळा बसवला आहे. गणेश स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे समजते. कारले यांनी पुतळा बसवल्यावर त्याखाली जर कोणी हा पुतळा काढला किंवा तसा प्रयत्न झाला तर महाराष्ट्र पेटेल अशी पाटी लिहून ठेवली आहे.
दरम्यान या घटनेचे संभाजी ब्रिगेडने स्वागत केले असून जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले की, गेले आठ वर्षे आम्ही पुतळा बसवण्याची मागणी करत होता. पण कोणत्याही राजकीय पक्षाने त्यात रस दाखवला नव्हता. अखेर एका युवकाने, सच्चा शिवप्रेमी, शंभुप्रेमीने हे पाऊल उचलले याचा आम्हाला आनंद आहे. महापालिकेने तात्काळ हा पुतळा अधिकृत करून त्याला कायमस्वरूपी परवानगी द्यावी.असे झाले नाही तर महाराष्ट्र पेटेल असा इशाराही त्यांनी दिला.हा एकप्रकारे शिवप्रेमी आणि शंभुप्रेमींचा सर्जिकल स्ट्राईक असल्याचेही ते म्हणाले.