नम्रता फडणीस / पुणेसंभाजी उद्यानात छत्रपती संभाजीमहाराजांचे शिल्प साकारले जात आहे. दीड महिन्यापूर्वीच निविदा काढून उद्यानात शिल्प उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, या कामाबाबत गुप्तता पाळली जात आहे. या संदर्भात उद्यान विभागासह संबंधित व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी शिल्प उभारण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, एकमेकांच्या खात्याकडे चेंडू सरकवत अतिरिक्त माहिती देण्यासंबंधी ‘मौन’ बाळगले. महापालिका आयुक्त कुणालकुमार यांच्याशीदेखील संपर्क साधला असता त्यांनी उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याचे सांगितले. मात्र, काही वर्षांपूर्वीच संभाजी उद्यानात छत्रपती संभाजीमहाराजांचे शिल्प बसवणे आणि सुशोभीकरण करणे या आमदार अनिल भोसले यांनी प्रस्तावित केलेल्या ठरावाला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती मिळाली आहे. ही मंजुरी मिळून अडीच वर्षांचा कालावधी उलटला, तरीही कामाला मुहूर्त लागला नव्हता. उद्यानासारख्या ठिकाणी पुतळा किंवा शिल्प उभे करताना हरित लवादाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असते. महाराजांचे शिल्प उद्यानात बसविण्यासाठी काही वर्षांपासून महापालिकेचा पाठपुरावा सुरू होता. या बांधकामाला राष्ट्रीय हरित लवादाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबरोबरच काही महिन्यांपूर्वी या कामाबद्दलच्या सर्व परवानग्याही पालिकेला मिळाल्या. त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली.
संभाजीमहाराजांचे साकारतेय शिल्प
By admin | Published: March 25, 2017 3:57 AM