पुणे : संभाजी महाराज उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा. राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी उद्यानामध्ये बसविण्याचा महानगरपालिकेने कुठल्याही पद्धतीचा प्रयत्न करु नये. गडकरींचा पुतळा अन्य कुठल्याही नाट्यगृहासमाेर बसवण्यास संभाजी ब्रिगेडची हरकत नाही. मात्र संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा चालणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेड कडून देण्यात आला आहे.
तीनवर्षापूर्वी संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा पाडण्यात आला हाेता. गडकरींनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखान केले असल्याचा आराेप करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुतळा पाडला हाेता. आज अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या सदस्यांनी गडकरींच्या ताेडलेल्या स्मारकाची पूजा करुन जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच पालिका गडकरींचा पुतळा बसवून देण्याचे नुसते आश्वासन देत आहे, प्रत्यत्रक्षात कुठलेही काम सुरु करण्यात आले नाही असा अराेप यावेळी करण्यात आला. तसेच पुणे शहरात कुठेही गडकरींचा पुतळा बसवून देण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यता आली.
दरम्यान पालिकेने संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा गडकरींचा पुतळा बसविण्याचा कुठल्याही पद्धतीचा प्रयत्न करु नये असा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे. तसेच महापाैर आणि महानगरपालिकेने संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी वेळकाढूपणा करु नये अन्यथा 14 मे ला संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी तीव्र आंदाेलन करण्यात येईल असेही ब्रिगेडकडून सांगण्यात आले आहे.