लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर त्यास ताजेपणा येईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना ॲड. आंबेडकर म्हणाले, “पवारांचे राजकारण चाळीस वर्षे पाहतोय. ते नेहमी ‘नरो वा कुंजरो’ भूमिका घेतात. इतर प्रश्नांवर ठीक आहे. पण मराठा आरक्षणावर ते नजीकच्या काळात स्पष्ट भूमिका घेतील अशी अपेक्षा करुया.” खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी (दि. २९) अॅड. प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर अॅड. आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा आरक्षणासह सर्वच आरक्षणाचे मुद्दे राज्यकर्त्यांसाठी त्रासदायक ठरणार आहेत. येणार्या सरकारला काही वेळ राजसत्ता चालवायला अडचणीचे ठरेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा आरक्षणात समस्या निर्माण झाली आहे. त्यावर राज्यपाल अथवा राष्ट्रपतींमार्फत पुनर्विचार याचिका हाच सध्या कायदेशीर मार्ग आहे.
“आरक्षण हा समाजाला व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मार्ग आहे. त्याचबरोबर प्रशासन आरक्षण हे ‘अॅडमिनिस्ट्रेशन प्रिन्सिपल’ होत आहे. पण इथले राज्यकर्ते ते मानायला तयार नाहीत,” असे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे न्यायचा तर त्यासाठी राजसत्तेची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणावरील चर्चेत संसदेत सांगितले की, “आरक्षण ही एक खिडकी आहे. ती आम्ही खुली केली आहे.” सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ही खिडकी बंद झाली असल्याचे ॲड. आंबेडकर म्हणाले. त्यावर उपाय म्हणून राज्यपाल अथवा राष्ट्रपतींमार्फत पुनर्विचार याचिका दाखल करता येईल. ती फेटाळली तरी पुन्हा दुसरी याचिका दाखल करता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
चौकटआंबेडकर-संभाजीराजे एकत्र
“राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते. तर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र का येऊ शकत नाहीत ? शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांचा समतेचा वारसा आम्हाला मिळाला आहे. समाजातील जातीय विषमता कमी करण्यासाठी बहुजन समाज एका छत्राखाली कसा आणता येईल, याविषयी आमची चर्चा झाली. मराठा आरक्षणावर त्यांनी आम्हाला दोन-तीन मार्ग सांगितले,” असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.