पुणे : तलवार, चॉपर, बांबू यांसारखी हत्यारे बाळगणे, खून, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा, अपहरण, जबरी चोरी, गंभीर दुखापत यांसारखे तब्बल १९ गुन्हे दाखल असलेल्या तीन अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी एकाच दिवशी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली. एकाच वेळी तीन गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या नऊ महिन्यांत २६ गुन्हेगारांवर अशी कारवाई केली आहे.
राकेश प्रकाश साळवे ( वय २३, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, मंगळवार पेठ), साईराज राणाप्रताप लोणकर ( वय २१, रा. पांडुरंगआळी, गणेश मंदिराशेजारील वाडा, कोंढवा खुर्द) आणि अजय उर्फ भज्या प्रकाश निकाळजे (वय २७, रा. गणेश मंदिरामागे, कोंढवा) अशी गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांनी त्यांच्या साथीदारांसह फरासखाना आणि कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक व्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती, तसेच त्याच्यापासून मालमत्तेचे आणि जीविताचे नुकसान होईल, म्हणून नागरिक तक्रार करताना धजावत नव्हते. फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे आणि कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी या तीन गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आदेश दिले.