पुणे : वैयक्तिक पातळीवर समलैंगिक विवाहांचा स्वीकार करण्याबाबत बहुतांश व्यक्तींचा दृष्टिकोन पारंपरिक आहे. समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्यास समाजावर विपरीत परिणाम होण्याची भीती बहुसंख्य व्यक्तींना वाटत आहे. ८३.९ टक्के लोकांच्या मते समलैंगिक विवाह हा भारतात चिंताजनक विषय आहे, तर केवळ १६.१ टक्के लोकांनी हा विषय गंभीर नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याच्या विषयावर पुण्यातील दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र हे समाजातील स्त्रियांचे स्थान आणि संबंधित मुद्द्यांवर गेली २० वर्षांपेक्षा अधिक काळ संशोधन करत आहे. समलैंगिक विवाहांबाबत समाजमन जाणून घेणे आणि या विषयावर समाजात प्रचलित असलेले मत जाणून घेणे, हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता.
दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राने १३ भाषांमध्ये हे सर्वेक्षण केले असून, यासाठी प्रतिसाद देणाऱ्यांची विभागणी १८ ते २५, २६ ते ४०, ४१ ते ६० आणि ६०पेक्षा अधिक अशा चार वयोगटांमध्ये, तर पुरुष, स्त्री व अन्य या तीन लिंगांमध्ये करण्यात आली होती.
..काय सांगताे अभ्यास
* ७५ टक्के लोकांना समलैंगिक विवाह ही नैसर्गिक घटना नसल्याचे वाटते.
* सर्वांना वाटते की समलैंगिक विवाहांचा भारतीय समाजावर विपरीत परिणाम होईल.
* प्रतिसाद देणाऱ्या सर्व वयोगटातील आणि लिंगाच्या बहुतांश व्यक्तींनी त्यांच्या किंवा जवळच्या कुटुंबातील समलैंगिक विवाहांना पाठिंबा न देण्याची भूमिका व्यक्त केली.
* भारतीय समाज समलिंगी विवाहास कायदेशीर मान्यता देण्यास तयार नाही. अशा प्रकारचा कायदा झाला तर त्याचे समाजावर दूरगामी दुष्परिणाम होतील, असे समाज मत आहे.
* समलैंगिकतेचा पुरस्कार केल्यास कुमार वयातील मुलामुलींवर त्याचे दुष्परिणाम होतील.
* बाहेरील देशांत हाेत असलेल्या दुष्परिणामांकडे आपण डोळसपणे पाहिले पाहिजे.
* कोणताही निर्णय घेण्यापूर्वी उद्भवू शकणाऱ्या समस्यांवर अध्ययन होणे गरजेचे आहे.