पुणे/ धनकवडी : वाढदिवस साजरा करुन खेड शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना ट्रकने दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यु झाला. तर ५ जण जखमी झाले आहेत. एकाचवेळी तिघा तरुणांच्या अपघातील मृत्युने तळजाई, पद्मावती परिसरावर शोककळा पसरली़. सातारा रोडवरील शिंदेवाडी येथे झालेल्या या अपघातात सुशील गोपाळ कांबळे (वय २३, रा. तळजाई पठार), सुरज शिंदे (वय २४) आणि अनिकेत भारत रणदिवे (वय २३) यांचा मृत्यु झाला़. सुशील कांबळे याचा वाढदिवस दरवर्षी साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे सोमवारी रात्री अकरा वाजता सुशिल याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व मित्र तळजाई टेकडीवर एकत्र आले. त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर सुशिल ने आपल्या आईला संपर्क साधून खेड शिवापूर ला जात असल्याचे सांगितले. पण, शिवापूर येथील दर्ग्याचे दर्शन घेण्यापूर्वीच अपघात झाल्याने ते परतलेच नाही़. अनिकेत रणदिवे याचेआई वडील भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करतात़. अनिकेत खाजगी कंपनी मध्ये कामाला होता. त्याच्या पाठीमागे तीन लहान भाऊ आहेत. सुरज शिंदे याचे वडील भंगार व रिक्षाचा व्यवसाय करतात. एक भाऊ आहे. सुरज याचे नुकतेच लग्न झाले होते. त्याची पत्नी पाच महिन्याची गर्भवती आहे. तिच्यावर मोठा आघात झाला आहे़ सुशिल उर्फ गोट्या कांबळे याच्या वडिलांचे त्याच्या लहानपणीच निधन झाले होते. घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आई धुण्याभांड्याची कामी करते. सुशिल हा शुभंम कुरकरे या दुकानात कामाला होता. या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर येथे नेण्यात आले आहेत़. अन्य जखमींवर भोर तालुक्यातील श्लोक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत़.