कोंढवा : कात्रज-कोंढवा रस्त्यावर बौद्ध विहार अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मात्र, घरात असलेल्या मुलाच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग विझवल्याने धोका टळला.आग लागलेल्या घरात राहत असलेल्या १५ वर्षीय हृषीकेश मोरे याने आगीची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला कळवली. त्यानुसार दलातील कोंढवा (खुर्द) अग्निशमन वाहन व देवदूत क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी दाखल झाली. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या घरामधे टीव्ही, कपाट, वायरिंग व इतर घरगुती वापराच्या साहित्याने पेट घेतला होता. जवानांनी ताबडतोब घरामधे पाण्याचा मारा करत दहा मिनिटांत आग पूर्णपणे विझवली. जवान गणपत पडये यांची सतर्कता महत्त्वाची ठरली. आगीचे कारण अद्याप समजले नाही.आगीबाबत हृषीकेश यांने अग्निशमन दलाला सांगितले, की तो झोपलेला असताना काहीतरी जळत असल्याचा वास आला. त्यावेळी घरातील वीज गेली असून काही वस्तू जळाल्याचे पाहिले. त्यामुळे त्याने तातडीने अग्निशमन दलास माहिती दिली. मला जाग आली नसती तर काहीतरी विपरित घडले असते, अशी भावना हृषीकेशने व्यक्त केली.सदर कामगिरीमध्ये कोंढवा अग्निशमन केंद्राचे तांडेल सुभाष जाधव, गणपत पडये, चालक सुखदेव गोगावले, जवान संग्राम देशमुख, विशाल यादव आणि देवदूत क्विक रिस्पॉन्स टीमचे अंबादास घनवट,प्रदीप कोकरे, अविनाश लांडे सहभागी होते.मी झोपलो असताना अचानक काहीतरी जळत असल्याचा वास आल्याने मी जागा झालो. तर घरातील वीज गेली असून काही वस्तू जळाल्याचे दिसले. मला जाग आली नसती तर काहीतरी विपरित घडले असते अशी भावना ऋुषिकेशने व्यक्त केली.
वेळीच जाग आली नि वाचला जीव, मुलाची सावधगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 2:07 AM