पुणे: गेल्या महिनाभरात सर्वेक्षण करताना राज्यात मंकी पॉक्स सदृश लक्षणे आढळून आलेल्या 10 संशयित रुग्णांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी आठ जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून, दोन नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. दरम्यान नागरिकांमध्ये विनाकारण भीती पसरू नये यासाठी हे नमुने कोणत्या जिल्ह्यातील आहेत ही माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचा एक रुग्ण सापडला तरी ती महामारी असल्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये देशात मंकी पॉक्सचे चार रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात अद्याप एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. परंतु सध्या मंकी पॉक्स आजाराची लक्षणे आढळून येणा-या रुग्णांचे आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे.
महिनाभरात दहा संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे तातडीने पाठवून संशयित रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले होते. त्यापैकी आठ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. उर्वरित नामुन्यांचा अहवाल लवकरच येणार आहे.
घाबरू नका काळजी घ्या
- मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी 2 ते 4 आठवड्यात बरा होतो.- आरोग्य खात्याकडून खबरदारीच्या दृष्टीने या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.- आपल्या भागात मंकी पॉक्ससदृश लक्षणे आढळल्यास त्वरित विलगीकरण करुन नजीकच्या आरोग्य केंद्राशी किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा.
आरोग्य सर्वेक्षण करताना गेल्या महिनाभरात आढळून आलेले संशयित 10 रुग्णांचे नमुने एन आय व्ही कडे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये दहापैकी तीन जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. तसेच देशांतर्गत प्रवास केला आहे. - डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य