लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : क्यू बार अँड कॉर्नर स्नूकर क्लबतर्फे आयोजित पहिल्या स्नूकर करंडक खुल्या अजिंक्यपद स्पर्धेत सम्राट सिंग, सिध्दार्थ टेंभे, यश खोटे, सतचीत जामगांकर, हृषीकेश इंगळे यांनी प्रतिस्पर्धांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
हडपसर येथे पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ३२ खेळाडूंनी भाग घेतला आहे. या स्पर्धेत माजी राष्ट्रीय विजेता शिवम अरोरा, तामिळनाडू राज्य विजेता व माजी भारतीय क्रमांक ४ विजय नचानी, स्नुकरपटू असलेला आणि आता हिंदी सिनेक्षेत्रातील कलाकार असणारा गौरव देशमुख, पुण्यातील साद सय्यद, अभिजित रानडे, अभिषेक बोरा, रोहन साकळकर, सिध्दांत फाटे असे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
इंदोरच्या सम्राट सिंग याने अश्विन पळनीटकर याचा संघर्षपूर्ण पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला. पुण्याच्या सिध्दार्थ टेंभे याने अथर्व घरीयाल याचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत यश खोटे याने सुदर्शन शिवरामचा पराभव केला. सतचीत जामगांवकर आणि हृषीकेश इंगळे यांनी अनुक्रमे रौनक जैन आणि तुषार सवाडी यांचा ३-० अशा सारख्याच फरकाने पराभव केला.
स्पर्धेचा निकाल : बाद फेरी : (सिक्स रेड स्नूकर) :
सम्राट सिंग वि.वि. अश्विन पळनीटकर ३-२ (५३-१८, ३४-४९, ४२-१३, ०३-३९, ३७-२७),
सिध्दार्थ टेंभे वि.वि. अर्थव घरीयाल ३-१ (३२-१६, २३-५१, ५७-४९, ३३-१५),
यश खोटे वि.वि. सुदर्शन शिवराम ३-१ (२८-०३, ०१-३२, २९-१४, २९-२०),
सतचीत जामगांवकर वि.वि. रौनक जैन ३-० (४४-१६, ४०-२०, ४८-२९),
हृषीकेश इंगळे वि.वि. तुषार सवाडी ३-० (३२-२८, ३४-१३, ३९-०५).