मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील ५ आरोग्य केंद्र व उपकेंद्र मंजूर करण्यात आली आहेत.
शासकीय आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन व बांधकामासाठी आशियाई विकास बँक यांचेमार्फत कर्ज रूपाने निधी उपलब्ध होण्याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वेळोवेळी नवीन आरोग्य संस्था स्थापन करणेस तसेच श्रेणीवर्धनास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर आरोग्य संस्था कार्यान्वित करण्याकरिता त्यांचे विहित कालावधीत बांधकाम पूर्ण करून जनतेचे आरोग्य सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. बांधकाम, यंत्रसामग्री, उपकरणे तसेच मनुष्यबळ उपलब्ध करण्याकरिता राज्य शासनाकडून मागणीपेक्षा कमी प्रमाणात निधी मिळत असल्याने राज्यातील आरोग्य संस्थांकरिता आवश्यक असलेला निधींपैकी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यात येणार असून, राज्याच्या हिश्श्याचे अनुदान उपलब्ध करण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे.