कोविडची दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या जुन्नर तालुक्यातील कोपरे गावातील योजनांना गती मिळाली असून मजगीच्या कामांच्या अंदाजपत्रकांना तालुका कृषी अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकारचे योजना राबवताना सांसद आदर्श ग्राम योजनेतील दत्तक गावांना प्राधान्य देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार खासदार डॉ. कोल्हे यांनी दत्तक घेतलेल्या कोपरे गावातील १५५.२४ हेक्टर शेतजमिनीवर मजगी करून भात लागवडीसाठी नवीन जमीन तयार करून देण्यात येणार आहे. त्यासाठी टीएसपी (ट्रायबल स्पेशल प्लान) अंतर्गत रु. १११ लक्ष रकमेची अंदाजपत्रके मंजूर करण्यात आली असल्याने कोपरे गावात राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांना गती मिळाली आहे.
यासंदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वेक्षण झाले आहे. लवकरच स्वर्गीय मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. पाठोपाठ मजगीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. कोपरे गरजेनुसार गावाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण होताच त्यानुसार विकासकामे हाती घेण्यात येतील.