पुणे : शहरातील सुमारे ५२ हजार पथदिव्यांवर नव्याने एलईडी स्वरूपाचे दिवे बसविण्यासाठी एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस (ईईएसएल) यांच्यासोबत करारनामा करून या दिव्यांसाठी १९ कोटी रुपये खर्च करण्यास गुरुवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. पुढील तीन महिन्यांत शहरासह नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्येही हे सर्व एलईडी दिवे बसविण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने निश्चित केले आहे. शहरात यापूर्वी बसविलेले ६६ हजार एलईडी दिव्यांपैकी ८० टक्के दिवे नव्याने बसविण्याची गरज असून, त्यासोबत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये एलईडी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय, शहरात काही ठिकाणी गेल्या वर्षी नुसतेच खांब बसविण्यात आले असले, तरी त्यावर दिवेच बसविण्यात आलेले नाहीत. अशा सर्व ठिकाणी ५२ हजार एलईडी दिवे बसवावे लागणार आहेत. एलईडी दिव्यांची खरेदी केवळ ईईएसएल यांच्याकडूनच करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिल्याने त्यासाठी आवश्यक १९ कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली. हा प्रस्ताव नगरविकास विभागाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित कंपनीसोबत करारनामा केला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात १० ते १५ हजार एलईडी दिवे तातडीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर, ५२ हजार दिवे पुढील तीन महिन्यांत बसविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी दिली.
शहरात नव्याने ५२ हजार पथदिवे बसविणार : १९ कोटींच्या खर्चाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:49 PM
शहरात काही ठिकाणी गेल्या वर्षी नुसतेच खांब बसविण्यात आले, त्यावर दिवेच नाहीत.
ठळक मुद्देसुरुवातीच्या टप्प्यात १० ते १५ हजार एलईडी दिवे तातडीने उपलब्ध करून दिले जाणार