खोर : दौंड तालुक्यातील खोर परिसरात महसूल विभागाच्या पथकाने वाळू - माती उपसा प्रकरणी तिघांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये तब्बल ३२ लाख ३६ हजार ४३६ रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात येणार असल्याची माहिती गाव कामगार तलाठी प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
खोरच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळू व माती उपसा सुरू आहे. कोणत्याही प्रकारची महसूल विभागाची परवानगी न घेता हा गौण खजिन्याची उपसा करण्यात येत आहे. या होत असलेल्या बेकायदेशीर माती व वाळू उपसा वर महसूल विभागाने छापे टाकत कारवाई केली आहे. या मध्ये संदीप बळवंत चव्हाण (रा.खोर, ता.दौंड) याने जमीन गट नं १२७, १३६, १४८, १५१, १२४ मधून १६२ ब्रास मातीचे व माती मिश्रित मुरूम १२६ चे उत्खनन करून उपसा केल्या प्रकरणी १८ लाख ५६ हजार ९८२ रुपयांची कारवाई करण्यात आली आहे. याचा खुलासा ७ दिवसाच्या आत न दिल्यास स्थावर जमिनीवर बोजा चढविणे व मालमत्ता जप्त करणे व तिची लिलावाव्दारे विक्री करणे नोटीस मध्ये सांगण्यात आले आहे.
रुपेश दिलीप चौधरी (रा.खोर, ता.दौंड) याने देखील पिंपळाचीवाडी येथील जमीन गट न १०३ मध्ये जेसीबी च्या साह्याने अनधिकृत माती व माती मिश्रित वाळू चे उत्खनन केले आहे. रुपेश चौधरी याला देखील ७ दिवसाच्या आत पुरावे सादर न केल्यास ६ लाख ४३ हजार ७५२ इतकी शासकीय मालमत्ते प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. याचा खुलासा ७ दिवसाच्या आत न दिल्यास स्थावर जमिनीवर बोजा चढविणे व मालमत्ता जप्त करणे व तिची लिलावाव्दारे विक्री करणे नोटीस मध्ये सांगण्यात आले आहे.
विशाल किसन पिसे (रा.खोर, ता.दौंड) याने देखील गट न १७८ मध्ये जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत माती व माती मिश्रित वाळू उपसा केला आहे. विशाल पिसे याला देखील ७ दिवसाच्या आत पुरावे सादर न केल्यास ७ लाख ३५ हजार ७०२ इतकी शासकीय मालमत्ते प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. याचा खुलासा ७ दिवसाच्या आत न दिल्यास स्थावर जमिनीवर बोजा चढविणे व मालमत्ता जप्त करणे व तिची लिलावाव्दारे विक्री करणे नोटीस मध्ये सांगण्यात आले आहे.
तब्बल ३२ लाख ३६ हजार रुपयांची मोठी कारवाई
या तीन ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाई मध्ये गावकामगार तलाठी प्रशांत जगताप यांनी तब्बल ३२ लाख ३६ हजार रुपयांची मोठी कारवाई केली आहे. प्रशांत जगताप यांनी नुकताच खोर गावाचा कारभार हाती घेतला असून यांनी केलेली कारवाई कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे. मात्र खोरच्या परिसरात नेहमीच माती व वाळू उपसा करण्यात येत असतो. कारवाई केली पैसे भरले की मशीन सुटले जातात आणि पुन्हा जैसे थे परिस्थिती राहते. याला नेमके कोण जबाबदार आहे. खोर ग्रामपंचायत या लोकांना पाठीशी घालते का काय असाच प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.