वालचंदनगर : वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याला चिरडले. बुधवारी (दि. १५) सायंकाळी ७ वाजता या अपघातात पादचाऱ्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. कळंब (ता. इंदापूर) येथे बीकेबीएन रस्त्यावर हा अपघात झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ट्रक पेटवून दिला. शेकडो ग्रामस्थ या वेळी रस्त्यावर उतरले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अवैध वाळू व्यावसायिकांवर कडक कारवाईचे धोरण स्वीकारल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. नीरा नदीतील वाळू घेऊन हा ट्रक भरधाव वेगाने निघाला होता. याच वेळी वालचंदनगर परिसरातील कळंब येथील मल्हारनगरच्या पाचलिंग मंदिराशेजारी आल्यानंतर ट्रकने बाळासाहेब गोरख सूर्यवंशी (वय ४५) या येथील रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्याला चिरडले. यामध्ये सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने चिरडल्याने त्यांचा अक्षरश: चेंदामेंंदा झाला. अपघाताचे स्वरूप भयावह होते. या वेळी सूर्यवंशी यांचा मेंदू रस्त्यावर पडल्याचे दृश्य होते. अपघातानंतर चालक वाळूचा ट्रक घेऊन पुढे निघून गेला. मात्र, या वेळी ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला पकडले. मात्र, ग्रामस्थांच्या भीतीने ट्रकचालक पळून गेला. अपघातानंतर न थांबता निघून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ट्रक पेटवून दिला. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शेकडो संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. या मार्गावरून वाळू वाहतूक सतत सुरू असते. विशेषत: सायंकाळी, रात्री वाळू वाहतूक बेधडक सुरू असते. त्यामुळे येथील जनजीवन असुरक्षित बनले आहे. येथील वाळूउपसा बंद करा, अवैध व्यवसायावर कडक कारवाई करा, अशी मागणी या वेळी संतप्त ग्रामस्थांनी केली. तहसीलदार येईपर्यंत सूर्यवंशी यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यांचा मृतदेह लासुर्णे येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत तहसीलदार या ठिकाणी पोहोचले नव्हते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता.सूर्यवंशी हे याच परिसरात पाचलिंग मंदिराशेजारी वास्तव्यास आहेत. त्यांचा हेअर सलूनचा व्यवसाय आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
वाळू वाहतुकीच्या ट्रकने पादचाऱ्याला चिरडले
By admin | Published: February 16, 2017 3:00 AM