वाघोली : खडीची वाहतूक करताना डंपरवर ताडपत्री बांधणे बंधनकारक असताना बहुतांश डंपरमालक आणि चालकांकडून ताडपत्री न बांधता मालाची वाहतूक केली जात असल्यामुळे दुचाकीचालकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. आरटीओच्या दुर्लक्षामुळे डंपरचालकांना भीतीच राहिली नसल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे. वाघोली, लोणीकंद, भावडी परिसरातील दगडखाणींमधून तयार होणाऱ्या खडी आणि क्रशसॅण्डची डंपरमधून वाहतूक केली जाते. या भागातून शेकडो डंपर दररोज पुणे-नगर महामार्गाने मालाची वाहतूक करीत असतात. डंपरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मालाची वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक, मद्यपान करून डंपर चालविणे, बिगरपरवाना वाहन चालविणे, गायब नंबर प्लेट, रेडियम रिफ्लेक्टरकडे आरटीओच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. आरटीओच पाहत नसल्यामुळे डंपरचालक आणि मालकदेखील या गोष्टींकडे कानाडोळा करीत असतात. या प्रकारांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. (वार्ताहर)
ताडपत्री न टाकता वाळूची वाहतूक
By admin | Published: July 23, 2015 4:23 AM