सोमेश्वरनगर : सोमेश्वरनगर परिसरामध्ये वाळूमाफियांचे कारनामे अजूनही सुरूच आहेत. सोमवारी (दि. १२) सकाळी सहाच्या दरम्यान एका वाळूच्या हायवा ट्रकने हांडे पुलाचे लोखंडी कठडे तोडून पुलाचे नुकसान केले आहे.जानेवारी महिना उजाडला की, नीरा नदीवरील बंधा-यांचे ढापे पडले की परिसरात वाळूचोरांचे कारनामे सुरू होतात. परवानगी नसतानाही रात्रीच्या वेळी नदीमधून वाळूची चोरटी वाहतूक केली जाते. गेल्या वर्षी अशाच प्रकारे निंबूत छपरी या ठिकाणी घुमटवस्तीवरील लोखंडी पूल वाळू वाहतूक करणाºया ट्रकने तोडला होता, तर २ वर्षांपूर्वी कांबळेश्वर येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधाराच वाळूमाफियांनी सुरुंग लावून फोडला होता.सोमवारी सकाळी सहा वाजता सोमेश्वर हायस्कूलच्या दिशेने हायवा ट्रक वाळू घेऊन नीरा डाव्या कालव्याच्या खाली निघाला होता. हा ट्रक नीरा डावा कालव्याच्या लोखंडी हांडे पुलावर आल्यावर ट्रक ड्रायव्हरचे ट्रकवरील नियंत्रण सुटून या ट्रकने १० ते १५ फुटांपर्यंतचे लोखंडी कठडे तोडत नेले. निम्मा ट्रक पुलावर तर निम्मा लोखंडी कठड्याला अडकून झुलत होता. ट्रकमध्ये वाळूचा बोजा आल्याने ट्रक बाहेर काढण्यास अडचण होत होती. १२ वाजता हा ट्रक बाहेर काढण्यास यश आले. या अपघातामुळे सकाळी सहा पासून वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे शाळकरी मुले आणि शेतकरी यांची अडचण झाली होती.परिसरातील शेतकरी सभासद आणि शाळकरी मुले यांची अडचण होऊ नये म्हणून सोमेश्वर कारखान्याने कायक्षेत्रातील परिसरात नीरा डाव्या कालव्यावर सहा लोखंडी पूल उभारले आहेत. या पुलावरून जड वाहतूक केली जाऊ शकत नाही, तरी दरवर्षी पुलांवरून वाहतूक करतात.
वाळूच्या ट्रकने तोडला लोखंडी पुलाचा कठडा, नीरा नदीमधून वाळूची चोरटी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 1:08 AM